स्टॅन स्वामींच्या जामिनावर सुनावणी सुरू झाली अन् वकील म्हणाले, पहाटेच त्यांचं निधन झालंय!

प्रकृती ठीक नसल्याने उच्च न्यायालयाने स्टॅन स्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश 28 मे रोजी दिले होते.
Koregaon Bhima violence accused Stan Swamy passes away
Koregaon Bhima violence accused Stan Swamy passes away

नवी दिल्ली : एल्गार परिषद (Elgar Parishad) व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले स्टॅन स्वामी यांचे आज रुग्णालयात निधन झाले. सोमवारी त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. स्टॅन हे 84 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कालपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. (Koregaon Bhima violence accused Stan Swamy passes away)

प्रकृती ठीक नसल्याने उच्च न्यायालयाने स्टॅन स्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश 28 मे रोजी दिले होते. त्यानुसार त्यांना मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात स्वामी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आज त्यावर सुनावणी होणार होती. पण पहाटेच त्यांचे निधन झाल्याची माहिती वकिलांनी न्यायालयात दिली.

मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये स्वामी यांच्यासह इतर आरोपी दाखल होते. आरोग्यविषयक चांगल्या सुविधा नसल्याची तक्रार सातत्याने केली जात होती. कारागृह अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय सुविधा, चाचण्या, स्वच्छता तसेच शारीरिक अंतर याबाबत योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. स्वामी यांनी मे महिन्यात व्हिडिओ काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात याबाबत माहिती दिली होती. ही स्थिती अशीच राहिल्यास आपला लवकरच मृत्यू होईल, असंही स्वामी म्हणाले होते. 

स्वामी हे मागील पाच दशकांपासून झारखंडमधील आदिवासींसाठी काम करत आहेत. त्यांचा नक्षलवादी, विशेषत: सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला होता. मागील महिन्यात NIA ने स्वामी यांच्या जामीनाला विरोध केला होता. 

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी मोठी हिंसाचार झाला होता. आदल्यादिवशी शनिवारवाडा येथे एल्गार परिषद पार पडली होती. यामध्ये प्रक्षोभक भाषणे करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. त्यामुळंच हिंसाचार घडल्याचा दावाही यंत्रणांनी केला होता. स्वामी यांचा या परिषदेशी संबंध असल्याचा आरोप NIA ने केला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com