गोस्वामी आठवडाभरात सुटले पण एक पत्रकार दोन वर्षांपासून जामिनाविना तुरुंगातच... - kasmhir narrator journalist in jail from last two years without bail | Politics Marathi News - Sarkarnama

गोस्वामी आठवडाभरात सुटले पण एक पत्रकार दोन वर्षांपासून जामिनाविना तुरुंगातच...

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटेकवरुन मोठा गदारोळ उडाला होता. व्यक्तिस्वातंत्र्यांचा मुद्दाही या निमित्ताने उपस्थित झाला होता. मात्र, दोन वर्षांपासून कारागृहात खितपत पडलेल्या एका पत्रकाराच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. गोस्वामी हे तळोजा कारागृहात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे गोस्वामी यांची सात दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमधील एक पत्रकार तब्बल दोन वर्षे दिवस तुरुंगात खितपत पडला असून, तो अजूनही जामिनाच्या प्रतिक्षेतच आहे. 

गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. 

गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली आहे. दरम्यान, 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरमधील एका पत्रकाराला मागील दोन वर्षे जामिनाविना तुरुंगात खितपत पडावे लागले आहे. या पत्रकाराचे नाव आसिफ सुलतान असे असून, ते काश्मीर नॅरेटर या नियतकालिकाचे पत्रकार आहेत. त्यांना बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत दोन वर्षांपासून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे. 

सुलतान यांच्या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी तब्बल १५ महिन्यांनंतर झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांच्या प्रकरणात व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला दिला होता. सुलतान यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यांचे काय, असा प्रश्न त्यांचे कुटुंबीय उपस्थित करीत आहेत. सुलतान यांच्यावरील कोणताही आरोप सिद्ध न होता त्यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली आहेत. त्यांची आता तरी सुटका करा, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख