मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावणारे मंत्री राजीनाम्याच्या तयारीत

सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता बंडाचे निशाण फडकावणाऱ्या या मंत्र्याने राजीनामा देण्याची तयारी केली आहे,.
karnataka minister eshwarappa may resign amid conflict with chief minister
karnataka minister eshwarappa may resign amid conflict with chief minister

बंगळूर : मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे पंचायतराज मंत्री ईश्वरप्पा यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे समजते. परंतु, ते दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा न देता थेट भाजप पक्षश्रेष्ठींच्या हातात राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही समर्थक आमदार व मंत्र्यांची बैठक घेऊन ईश्वरप्पा यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. 

मुख्यमंत्री येडियुरप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र हे प्रशासनात कसा हस्तक्षेप करीत आहेत, मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांना कसे पाठीशी घालत आहेत, विकास निधी वितरणात कसा पक्षपात केला जातो, आदी मुद्दे ईश्वराप्पा श्रेष्ठींसमोर मांडणार आहेत. दरम्यान, ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा संतप्त झाले आहेत. ईश्वरप्पांची हकालपट्टी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

यासंदर्भात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी समर्थक मंत्री व आमदारांची आज गुप्त बैठक घेतली. यानिमित्ताने मेजवाणीचे आयोजनही करण्यात आले होते. बैठकीला गृहमंत्री बसवराज बोम्मई, महसूलमंत्री आर. अशोक, आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर, कृषीमंत्री बी. सी. पाटील, आमदार एम. पी. रेणुकाचार्य आदी उपस्थित होते. समर्थक मंत्री व आमदारांना आपल्या पाठीशी खंबीर राहण्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी आवाहन केले. 

मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे, असा बॉम्ब पंचायत राज मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांनी टाकला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपाला वजूभाई वाला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि कर्नाटकचे प्रभारी व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांना पाठवली आहे. 

ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे की, प्रशासनात व्यवस्थितपणा आणि नियमितपणा येण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. मुख्यमंत्री हे वारंवार माझ्या मंत्रालयात हस्तक्षेप करीत आहेत. कर्नाटक मंत्रिमंडळ सत्ता विभाजन नियमाचे उल्लंघन करुन मुख्यमंत्री माझ्या कामकाजात ढवळाढवळ करीत आहेत. 

ईश्वरप्पा यांच्या तक्रारीनंतर सरकारमधील मुख्यमंत्र्यांविरोधातील असंतोषाला तोंड फुटले आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक मंत्री आणि आमदारांची नाराजी आहे. येडियुरप्पा आणि ईश्वरप्पा हे दोघेही शिवमोगा जिल्ह्यातील आहेत. दोघांमध्ये याआधी अनेकवेळा भांडणे आणि समझोता होण्याचे प्रकार घडले आहेत. येडियुरप्पा पहिल्यांदा २००८ मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळी ईश्वरप्पा यांचा त्यांना उघड विरोध होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com