पार्टीनं केला घात; मेडिकल कॉलेजमधील 182 जणांना कोरोनाचा विळखा

बहुतेकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
पार्टीनं केला घात; मेडिकल कॉलेजमधील 182 जणांना कोरोनाचा विळखा
Medical Students Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने देशभरात अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक, घरगुती कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली आहे. पण हीच गर्दी आता कोरोना संसर्ग वाढीसाठी सुपरस्प्रेडर ठरू लागली आहे. एका पार्टीमध्ये सहभागी झालेल्या 182 जणांना एकाचवेळी कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील बहुतेकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

जगभरात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लशीचे (Covid Vaccine) दोन डोस दिले जात आहे. आता कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस (Booster Dose) देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. कर्नाटकातील धारवाड येथील एसडीएस वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. यानंतर महाविद्यालयातील 400 पैकी 300 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी सुरूवातीला 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं.

Medical Students
योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदी काय सांगत होते? अखेर 'त्या' फोटोचा उलगडा झाला...

त्यानंतर महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील प्रत्यक्ष होणारे वर्ग रद्द करून व्हर्च्युअल वर्ग घेण्यास सांगण्यात आले आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आणखी काही जणांचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे हे महाविद्यालय कोरोनाचे क्लस्टर बनल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महाविद्यालयामध्ये 17 नोव्हेंबर रोजी एका फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व इतरही स्टाफही सहभागी झाला होता. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर तपासणी कऱण्यात आली. दरम्यान, बहुतेकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे काही जणांचे नमूने जनुकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आहे किंवा नाही, याबाबत तपासणी केली जाणार असल्याचे राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वांना बूस्टर डोस लवकरच मिळणार

दरम्यान, लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठक पुढील दोन आठवड्यांत होणार आहे. सरकार नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. या बैठकीत बूस्टर डोस देण्याबाबतचा सर्वंकष आराखडा ठरवला जाणार आहे. याचबरोबर लहान मुलांना कोरोना लस देण्याचाही निर्णयही झाला असून, याची सुरवात जानेवारीपासून होणार आहे.

Medical Students
राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढल्या; उच्च न्यायालयानं दिला मोठा झटका

कोविशिल्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटूयटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. माझ्यासह कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही तिसरा डोस घेतल्याची कबुली देत त्यांनी इतरांनाही तिसरा डोस घ्यावाच लागेल, असे म्हटले होते. भारतात सध्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन यांसह पाच लशी उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही लस घेतली तरी त्याचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस बूस्टर डोस म्हणून गृहित धरला जातो. पण पूनावाला यांनी आता तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचे म्हटले होते. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण काही दिवसानंतर कमी होत जात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in