परदेशातून परतलेल्या येडियुरप्पांना विमानतळावरच 'सरकारी सरप्राईज'!

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा नुकतेच सगळ्या कुटुंबीयांसह विदेशात पर्यटनासाठी गेले होते.
karnataka government gifts toyoto vellfire car to b s yediyurappa
karnataka government gifts toyoto vellfire car to b s yediyurappa

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा नुकतेच सगळ्या कुटुंबीयांसह विदेशात पर्यटनासाठी गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांची राज्यात फिरण्याची सोयही सरकारने केली आहे. 

येडियुरप्पा हे कुटुंबीयांसह मालदीवमधून परतल्यानंतर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्यासाठी राज्य सरकारने नवी कोरी कार पाठवली होती. या कारमधून त्यांना घरी नेण्यात आले. राज्य सरकारने येडियुरप्पांना तब्बल 1 कोटी रुपयांची ही महागडी कार भेट दिली आहे. टोयोटा वेलफायर ही ती कार असून, या कारमधून येडियुरप्पा राज्यभरात दौरा करणार आहेत. राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी येडियुरप्पांचा हा दौरा असणार आहे. 

ही कार मैत्री मोटर्स या कंपनीच्या नावावर आहे, येडियुरप्पांच्या कुटुबीयांच्या मालकीची ही कंपनी असून, तिचे कार्यालय त्यांचा मूळ जिल्हा शिमोग्यात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कारची नोंदणी दक्षिण बंगळूर आरटीओमध्ये झाली आहे. येडियुरप्पा आणि त्यांचे कुटुंबीय भारतात परतण्याआधी दोन दिवस ही नोंदणी करण्यात आली आहे. 

येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महिनाभरातच ते विदेशात गेले होते. येडियुरप्पांना खासदार बी.वाय.राघवेंद्र आणि भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. मुले आणि मुलींच्या कुटुंबांसमवेत येडियुरप्पा 18 ऑगस्टला मालदीवला रवाना झाले होते. मागील 10 वर्षांत प्रथमच येडियुरप्पा हे कुटुंबीयांना घेऊन विदेशात फिरायला गेले होते, अशी माहिती येडियुरप्पांच्या निकटवर्तीय भाजप नेत्याने दिली. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com