प्रदेशाध्यक्षांविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं; नेत्याचे सहा वर्षांसाठी निलंबन

10 ते 12 टक्के लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्षांविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं; नेत्याचे सहा वर्षांसाठी निलंबन
Salim Ahmed and V. S. Ugarappa

बेंगलुरू : कर्नाटक काँग्रेसचे (Karnataka Congress) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच माजी खासदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिवकुमार यांच्याविषयीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये वादळ उठलं आहे.

शिवकुमार यांच्यावर 10 ते 12 टक्के लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ते मद्यप्राशन करून कार्यालयात येत असल्याचा उल्लेख काँग्रेसमधील दोन नेत्यांमधील संभाषणात करण्यात आला आहे. माजी खासदार व्ही. एस. उगरप्पा (V. S. Ugarappa) आणि प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक सलीम अहमद (Salim Ahmed) यांच्यामधील संवादाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.

Salim Ahmed and V. S. Ugarappa
प्रदेशाध्यक्ष दारू पिऊन बोलतात, 10 टक्के लाच घेतात! काँगेस नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल

दोघांमधील संभाषणाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अहमद यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उगरप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाविषयी बोलताना शिवकुमार यांनी संभाषणातील आरोप फेटाळून लावले आहेत. माझा आणि पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही. पत्रकार परिषदेपूर्वी हे संभाषण झालेले आहे. ते कॅमेरात कैद झाले. पक्षामध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही, असं शिवकुमार यानी स्पष्ट केलं आहे.

उगरप्पा यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. शिवकुमार यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांमध्ये असलेलं मत सलीम यांनी बोलून दाखविले होते. मी त्यांना न बोलण्याबाबत सांगितले होते. पण बोलतच राहिले. पक्षामध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही. आम्ही भ्रष्टाचारमुक्त कर्नाटकसाठी प्रयत्न करत आहोत. शिवकुमार, सिध्दरामय्या, मल्लिकार्जून खरगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी पक्ष एकजुटीने काम करत असल्याचेही उगरप्पा यांनी सांगितले.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

शिवकुमार व त्यांचे सहकारी लाच घेत असल्याचा थेट आरोप यामध्ये कऱण्यात आला आहे. सलीम अहमद म्हणतात की, आधी 6 ते 8 टक्के लाच घेतली जात होती. आता ही 10 ते 12 टक्क्यांवर गेली आहे. डीके अशीच तडजोड करतात. मुलगुंड (डीके यांचे सहकारी) यांनी यातून 50 ते 100 कोटी रुपये कमावले आहेत. मुलगुंड यांनी एवढे कमावले असतील तर डीके यांना किती मिळाले असतील, असा विचार करा, असा आरोप अहमद करताना दिसत आहेत.

शिवकुमार यांचा पक्षाला काही उपयोग नसल्याचे विधानही दोघांनी केले आहे. डीके यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले. पण त्यांनी आम्हाला आणि पक्षाला दुखावलं आहे, असे उगरप्पा बोलताना दिसतात. शिवकुमार हे अडखळत बोलत असतात. मला माहित नाही की त्यांचा बीपी कमी असतो की ते दारू पिऊन येतात. माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत विचारले आहे. सिध्दरामय्या यांची देहबोली कडक आहे, असंही अहमद म्हणाले आहेत. डी. के. शिवकुमार हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत.

Related Stories

No stories found.