गरज सरो वैद्य मरो...मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदाराचे कॅबिनेट मंत्रिपद काढून घेतले - karnataka cm yediyurappa tells mla h nagesh to resign from cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

गरज सरो वैद्य मरो...मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदाराचे कॅबिनेट मंत्रिपद काढून घेतले

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जानेवारी 2021

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर मंत्रिमंडळ विस्तार केला आहे.   

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सात आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद  दिले आहे. यात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीतून भाजपमध्ये आलेल्या दोन आमदारांचा समावेश आहे. याचवेळी मंत्रिमंडळात असलेल्या अपक्ष आमदाराचे मंत्रिपद त्यांनी काढून घेतले आहे. या विस्तारातून येडियुरप्पांनी त्यांची  मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आणखी भक्कम केली आहे.  

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. सध्या मंत्रिमंडळात 27 मंत्री असून, एकूण क्षमता 34 पर्यंत वाढवता येऊ शकते. 

शहा, नड्डांची भेट झाली अन् येडियुरप्पा म्हणाले, आता लवकरच गुड न्यूज!

अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी आज जाहीर केला. त्यांनी म्हटले आहे की, एमटीबी नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. ते आजच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नव्या मंत्र्यांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी दुपारी 3.30 वाजता होईल.  

येडियुरप्पांना अखेर सात आमदारांना दिली 'गुड न्यूज'!

नव्याने मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सोडून भाजपमध्ये आलेल्या एम.टी.बी.नागराज आणि आर.शंकर यांचा समावेश आहे मात्र, मुनिरत्न यांचा समावेश नाही. याचवेळी येडियुरप्पांनी अपक्ष आमदार आणि उत्पादन शुल्क मंत्री एच.नागेश यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यांच्या जागा भरणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

यावरुन नागेश हे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेत त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी येडियुरप्पांना प्रत्यक्ष भेटून करुन दिली आहे. नागेश हे कोलारचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या समर्थनार्थ कोलार जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहेत.  नागेश यांना मंत्रिमंडळातून हटवल्यास सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

याबाबत नागेश म्हणाले की, सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी मला पूर्ण कार्यकाळ मिळेल, असे सांगितले होते. आता त्यांनी माझा विश्वासघघात केला आहे. राज्यातील भाजप सरकार स्थापन होण्यात माझा मोठा वाटा होता. आता मुख्यमंत्री त्यांचा शब्द विसरले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख