व्यवस्थेचे बळी : कर्नाटकात ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांनी गमावला जीव - in karnataka 24 patients die hospital due to oxygen shortage | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

व्यवस्थेचे बळी : कर्नाटकात ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांनी गमावला जीव

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होण्याची मालिका थांबत नसल्याचे विदारक चित्र आहे.  

बंगळूर : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होण्याची मालिका थांबत नसल्याचे विदारक चित्र आहे. कर्नाटकातील चामराजनगर येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांना जीव गमावावा लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कर्नाटक सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या रुग्णालयात 144 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 

रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता.2) रात्री 12 वाजता त्यांना रुग्णालयातून रुग्णांचे कॉल येण्यास सुरवात झाली. ऑक्सिजन संपला असून, लवकरात लवकर काय करता येईल ते पाहा, असे त्यांनी सांगितले. हे ऐकून नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोचले. परंतु, त्यांना रुग्णालयात आत सोडण्यात आले नाही. अखेर रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. 

या प्रकरणी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी चौकशीचे आदेश दिले असून, आयएएस अधिकारी शिवयोगी कलसाद यांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. ते तीन दिवसांत चौकशी करुन सरकारला अहवाल सादर करणार आहेत. मृतांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

याबाबत बोलताना म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह म्हणाले की, काल रात्री रुग्णालयातील ऑक्सिजन टंचाईची बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली. मी उपायुक्तांना कॉल करुन ऑक्सिजन पुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला कॉन्फरन्सवर घेतले. तसेच, सदर्न गॅसशी मी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने 15 सिलिंडर पुरवले. परंतु, तोपर्यंत ही दुर्घटना घडली होती. 

देशात 24 तासांत 3 हजार 417 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 68 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 142 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 959 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख