भाजपचे 15 आमदार बंडाच्या पवित्र्यात...दिल्लीत पक्षश्रेष्ठींची घेणार भेट - in karnataka 15 bjp mlas wil meet party leadership in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे 15 आमदार बंडाच्या पवित्र्यात...दिल्लीत पक्षश्रेष्ठींची घेणार भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. भाजपचे 15 आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. 

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्याबद्दल पक्षातील नाराजी कायम आहे. येडियुरप्पांच्या विरोधात भाजपचे 15 आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. हे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असलेले आहेत. ते याच महिन्यात दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर जाऊन गाऱ्हाणे मांडणार आहेत. 

येडियुरप्पांबद्दल दिवसेंदिवस राज्यातील भाजपमध्ये नाराजी वाढत आहे. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवावे, यासाठी भाजपचे 15 आमदार आक्रमक झाले आहेत. ते दिल्लीला या महिन्यात जाणार आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. 

कर्नाटकात येडियुरप्पांची गच्छंती होऊन लवकरच नवीन मुख्यमंत्री

याबद्दल बोलताना यातील एक आमदार म्हणाला की, आम्ही राज्यात नेतृत्व बदलाची मागणी केलेली नाही अथवा आम्हाला मुख्यमंत्रिपद मागितलेले नाही. आम्ही राज्यातील 2013 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाला जागे करीत आहोत. आगामी निवडणुकांचा विचार करुन राज्य सरकार आणि पक्षाने काम करायला हवे. यासाठी सर्व व्यवस्थेत बदल करायला हवा. 

आम्हाला मोदी सरकारचे मॉडेल कर्नाटकात हवे आहे. मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज आहेत मात्र, आम्ही त्यांच्यातील नाही. अशा आमदारांना आम्ही थाराही देत नाही. आमचा कोणताही अजेंडा नाही, असेही या आमदाराने स्पष्ट केले. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर नाराजीमुळे त्यांना 24 तासांत मंत्र्यांचा खातेबदल करावा लागला होता. तरीही नाराजी कायम होती. यामुळे नंतर पाच दिवसांत चार वेळा खातेबदल करण्यात आला होता. येडियुरप्पांनी एक प्रकारे खातेबदलाचा विक्रमच केला आहे. यात काही मंत्र्यांकडील मोठी खाती काढून त्यांना छोटी खाती देण्यात आली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांची नाराजी कायम आहे. 

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी हे पुन्हा एकत्र आले आहेत. येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. याचबरोबर पुढील निवडणुका ते एकत्र लढू शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतिपदी भाजपचे एम.के.प्राणेश यांनी निवड झाली आहे. जेडीएसच्या पाठिंब्यावर ही निवड झाली आहे. 

येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. येडीयुरप्पा आणि भाजप नेतृत्वाचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले आहेत. मात्र, राज्यात येडीयुरप्पा यांना डावलणे शक्य नसल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. येडीयुरप्पा यांच्यावर पदावरुन पायउतार होण्यासाठी दबाव आणल्यास ते नवीन पक्ष स्थापन करु शकतात, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. यासाठी ते जेडीएसची मदत घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख