kangana ranaut slams jaya bacchan for not talking about bollywood issues | Sarkarnama

अभिषेकने गळफास घेतला असता तर असेच म्हणाला असता का? कंगनाचा जया यांना सवाल

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन बॉलीवूड ढवळून निघाले आहे. आता जया बच्चन आणि कंगना राणावत यांच्यात जुंपली आहे. यात शिवसेनेने बच्चन यांनी पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली : बॉलीवूडच्या जिवावर मोठे झालेले काही कलाकाराच या क्षेत्राची बदनामी करीत असल्याची टीका खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी आज राज्यसभेत केली. याला आता कंगनाने प्रत्युत्तर दिले आहे. सुशांतच्या जागी तुमच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असती तर असेच म्हणाला असता का, असा सवाल कंगनाने केला आहे. दरम्यान, या वादात शिवसेना आता जया बच्चन यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. 

जया बच्चन राज्यसभेत आज म्हणाल्या की, काल लोकसभेत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे मला लाजिरवाणे वाटत आहे. चित्रपट उद्योग प्रत्यक्षपणे 5 लाख लोकांना तर अप्रत्यक्षपणे 50 लाख लोकांना रोजगार देतो. मात्र, या उद्योगाला सरकारचा काहीही पाठिंबा नाही. उलट सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा छळच होतो आहे. त्यात येथेच मोठे झालेले काही लोक या क्षेत्राबद्दल सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बोलतात. काल लोकसभेत एक खासदाराने चित्रपटसृष्टीची तुलना गटाराशी केली. हे लज्जास्पद आहे. अशांना चाप लावण्याची आवश्यकता आहे. काही लोकांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला बदनाम करणे या लोकांनी थांबवावे. 

जया बच्चन यांचे नाव पुकारल्यावर त्यांनी आपल्याला मास्क घालून बोलण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. यावर सभापती वेंकय्या नायडू यांनी, इतके सुंदर व्यक्तिमत्व दिसत आहे व इतके प्रसिध्द नाव आहे. त्यांना स्वतःचा परिचय देण्याची गरज काय, अशी टिप्पणी केली. तोच धागा पकडून बच्चन म्हणाल्या की, मला हे ज्यामुळे नाव मिळाले त्या फिल्म इंडस्ट्रीला ड्रग व्यापाराशी जोडून बदनाम करण्याचे प्रकार सुरू आहेत.

आता कंगना राणावतने जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिले आहे. सुशांतसिंह व माझ्या जागी तुमचा मुलगा अभिषेक व मुलगी श्‍वेता असती तर असेच बोलला असतात का, असा सवाल तिने विचारला आहे. कंगनाने ट्विटरवर म्हटले आहे की, जयाजी माझ्या तुमची मुलगी असती तिला अमली पदार्थ दिले असते तिचा शोषण केले असते तर असेच बोलला असता का? जर अभिषेकला इतरांनी त्रास दिला असता आणि या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेतला असता तरीही असेच बोलला असता का? आमच्याप्रतीही काही सहानुभूती दाखवा. 

यानंतर शिवसेनेनेही बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. जया बच्चन काही चुकीचे बोलल्या नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले. अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्याचे अधिकार केंद्राच्या हातात आहेत. ड्रग नेपाळ, उत्तर प्रदेश, बिहारमधूनही येतात. पण फिल्म इंडस्ट्रीच्या आडून साऱ्या महाराष्ट्राच्याच बदनामीचे कट सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख