कंगनाचा तीळपापड...म्हणाली, बाबर अन् त्याच्या सैन्याने माझे राम मंदिर पाडले!

अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला आहे. यानंतरही कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे.
kangana ranaut said babar and his army demolishes my ram mandir
kangana ranaut said babar and his army demolishes my ram mandir

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. महापालिकेच्या या कारवाईवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगनाच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागात ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे 24 तासांत सादर करण्याची मुदत यामध्ये तिला देण्यात आली होती. तिने 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदा ठरवून तोडू शकते, असा इशारा देण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेचे पथक बुलडोझर घेऊन कंगनाच्या बंगल्यावर गेले. पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत भाग हातोडा आणि बुल़डोझरच्या सहाय्याने पाडून टाकला. 

यावर कंगना संतापली असून, तिने ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तिने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेली तुलना योग्य असल्याचा दावा केला आहे. तिने म्हटले आहे की, ही इमारत माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम!

महापालिकेच्या एच पश्‍चिम विभाग कार्यालयाकडे 2018 मध्ये कंगनाच्या बंगल्याबाबत तक्रार आली होती. त्यानंतर पालिकेने तिला नोटीसही पाठवली होती. या नोटिशीला तिने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले असून, न्यायालयाने तेव्हा महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे; तर तिच्या बंगल्यात कार्यालय तयार करण्याचे काम सुरू होते. महापालिकेच्या एच पश्‍चिम प्रभागाच्या इमारत कारखाने विभागाच्या पथकाने या बंगल्याला सोमवारी भेट देऊन पुन्हा पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा सुधारित नोटीस देण्यात आली असून बंगलाही सील करण्यात आला आहे.

हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354 (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत नमूद केले होते. या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आले आले; तर पूर्वीची दोन बांधकामे जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे, असे प्रथमदर्शनी दिसते.

कंगनाच्या बंगल्यात काही बेकायदा बदल आणि कायद्याचे उल्लंघन करून नियमबाह्य चटई क्षेत्र वापरण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे 24 तासांत सर्व कागदपत्रे सादर न केल्यास पालिकेकडून बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com