कंगनाला उच्च न्यायालयाचा दणका...चौकशीला हजर राहावेच लागणार

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणी दाखल गुन्हारद्द करण्यासाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
kangana ranaut and her sister will appear before mubai police says high court
kangana ranaut and her sister will appear before mubai police says high court

मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळून लावली. तसेच, मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्या दोघींनी भावाचे लग्नाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या समन्सला त्यांनी उत्तरच दिले नव्हते. 

मुंबई पोलिसांनी त्या दोघींना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यांना २३ व २४ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कंगना आणि रंगोलीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. कंगना आणि रंगोलीने तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजेरी लावली नाही याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

भावाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलो होतो, हे कारण न्यायालयाने अमान्य केले. काहीही कारण असले तरी समन्स बजावल्यानंतर त्याचे पालन करायलाच हवे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. आता दोघी 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. 

दरम्यान, कर्नाटक पोलिसांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com