काँग्रेसची कमलनाथ यांच्यावर मोठी जबाबदारी? सोनिया गांधींसोबत खलबते

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
kamal nath may be appointed as working president of congress
kamal nath may be appointed as working president of congress

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ हे आज सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. पक्षातील बदलांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कमलनाथ आधीपासून आहेत. काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक बऱ्याच काळापासून लांबणीवर पडली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर ही निवडणूक होईल. 

कमलनाथ हे गांधी परिवाराच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी नऊ वेळा संसदेचे सदस्य होते. ते पहिल्यांदा लोकसभेवर 1980 मध्ये निवडून गेले होते. ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर अधिवेशन संपल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोपवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत  जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते. 

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com