30 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती...पित्याने सांभाळलेल्या मंत्रालयाची धुरा पुत्राकडे - jyotiraditya scindia takes charge of civil aviation ministry | Politics Marathi News - Sarkarnama

30 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती...पित्याने सांभाळलेल्या मंत्रालयाची धुरा पुत्राकडे

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यांचे पिता माधवराव शिंदे (Madhavrao Scindia) यांनी सांभाळलेल्या नागरी हवाई वाहतूक (Civil Aviation) मंत्रालयाची धुरा जोतिरादित्य आता सांभाळतील.

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. आता जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

शिंदे यांनी आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. विशेष म्हणजे त्यांचे पिता माधवराव शिंदे यांनी 30 वर्षांपूर्वी या खात्याचा कार्यभार सांभाळला होता. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात माधवराव 1991 ते 1993 या काळात नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. आता त्यांचे पुत्रच या खात्याची धुरा सांभाळतील. माधवराव यांना हे मंत्रालय सांभाळत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एका विमान दुर्घनटेमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

हेही वाचा : पहिल्या लाटेमुळे गंगवार तर दुसऱ्या लाटेमुळे हर्ष वर्धन यांना बाहेरचा रस्ता 

आताचा विचार करता कोरोना महामारीमुळे नागरी हवाई वाहतूक क्षेत्र अडचणीत आले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचे आव्हान जोतिरादित्य यांच्यासमोर असणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, या वर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात हवाई वाहतूक मागील वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्याने कमी झालेली आहे. त्यामुळे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील माधवरावांचे अधुरे राहिलेले काम जोतिरादित्य पूर्ण करणार का, याकडे लक्ष लागले आहे.  

आणखी एक विशेष बाब म्हणजे, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्याआधी दोघेही केंद्रीय मंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात माधवराव रेल्वेमंत्री होते. तर जोतिरादित्य हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातच टपाल खात्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख