मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत जोतिरादित्य शिंदे तर राणे तिसऱ्या क्रमांकावर - jotiraditya scindia and narayan rane are rich ministers in new union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत जोतिरादित्य शिंदे तर राणे तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे असून, महाराष्ट्रातील नारायण राणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. 

एडीआर ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. यात उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोचली आहे. नव्या मंत्रिमंडळात 70 मंत्री (90 टक्के) करोडपती आहेत. प्रत्येक

मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे आहेत. त्यांची संपत्ती 379 कोटी रुपये आहे. पीयूष गोयल हे दुसऱ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 95 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे हे तिसऱ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 87 कोटी रुपये आहे. राजीव चंद्रशेखर चौथ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 50 कोटी रुपये आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 

नव्या मंत्रिमंडळात सर्वांत कमी संपत्ती असलेल्या मंत्र्यांमध्ये त्रिपुरातील प्रतिमा भौमिक असून, त्यांची संपत्ती केवळ 6 लाख रुपये आहे. पश्चिम बंगालमधील जॉन बारला यांची संपत्ती 14 लाख रुपये, राजस्थानमधील कैलास चौधरी यांची संपत्ती 24 लाख रुपये, ओडिशातील विश्वेश्वर टु़डू यांची संपत्ती 27 लाख तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले व्ही. मुरलीधरन यांची संपत्ती 27 लाख रुपये आहे, असे एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख