बंगालच्या फाळणीची मागणी करणाऱ्या खासदाराला मंत्रिपदाचे बक्षिस - John Barla who demanded North Bengal seperation gets Union Ministry | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

बंगालच्या फाळणीची मागणी करणाऱ्या खासदाराला मंत्रिपदाचे बक्षिस

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पश्चिम बंगालला चार मंत्रिपदं मिळाली आहेत.

कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पश्चिम बंगालला चार मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यामध्ये खासदार जॅान बारला, निसिथ परमाणिक, शंतनू ठाकूर आणि डॅा. सुभाष सरकार यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बारला यांचं नाव मागील महिन्यांत चर्चेत आलं होतं. त्यांनी बंगालच्या फाळणीची मागणी करत उत्तर बंगालला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्याची मागणी केली होती. आता मोदी सरकारमध्ये त्यांनाच मंत्री करण्यात आलं आहे. (John Barla who demanded North Bengal seperation gets Union Ministry)

बारला हे भाजपचे उत्तर बंगालमधील खासदार असून त्यांनी विभाजनाची मागणी केली आहे. त्यांना याच भागातील भाजपच्या आणखी एका खासदाराने पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून उत्तर बंगालला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, अशी या खासदारांची मागणी आहे. बारला हे उत्तर बंगालमधील चार खासदारांपैकी एक आहेत. त्यांची मागणी जयंता रॅाय यांनीही उचलून धरली आहे. 

हेही वाचा : एकनाथ शिंदे यांचा सामना आता कपिल पाटलांशी

यावरून मागील महिन्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसने जोरदार आंदोलनही केलं. बारला यांच्या या मागणीवर भाजपमधूनही विरोध झाला. बारला यांच्या अलीपुरदौर मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी थेट राजीनामा देत समर्थकांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही बारला यांच्या वक्तव्याला विरोध केला होता. भाजपचा असा कोणताही अजेंडा नाही. बारला हे पक्ष कार्यकारिणीच्या कोणत्याही पदावर नाहीत, असे घोष म्हणाले होते.

बंगालच्या फाळणीला भाजपचा पाठिंबा?

बारला यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. तृणमूलचे नेते सौगत रॅाय म्हणाले, 'बारला यांना मंत्रिपद देऊन भापने पश्चिम बंगालच्या विभाजनाला पाठिंबा असल्याचे दाखवून दिलं आहे. बारला हे विभाजनवादी आहेत. मागील दोन वर्षांपासून त्यांना कधी संसदेत बोलतानाही पाहिलं नाही.' 

तृणमूलचे आमदार मदन मित्रा यांनाही टीका केली आहे. ते म्हणाले, 'भाजप विभाजनवादी आहे. ज्या खासदारांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली त्यांनाच मंत्री करण्यात आलं आहे. एक दिवस भाजपकडून विधीमंडळाचंही विभाजन करा, अशी मागणी केली जाईल.' दरम्यान, मंत्रिपदाचा जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारला यांनी या मुद्यावर बोलण्यास नकार दिला आहे. मी लोकांच्या हितासाठी काम करू इच्छितो. उत्तर बंगालमधील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काम करेन. बंगालच्या नागरिकांना केंद्राच्या योजनांच्या फायदा मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही बारला म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख