जो बायडेन यांनी बदलला ट्रम्प यांचा 'तो' वादग्रस्त निर्णय - Joe Biden reversed Trump's controversial decision about WHO | Politics Marathi News - Sarkarnama

जो बायडेन यांनी बदलला ट्रम्प यांचा 'तो' वादग्रस्त निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जानेवारी 2021

जगात सर्वाधिक प्रबळ असलेल्या अमेरिकेतही सत्तांतरानंतर पहिल्या दिवशी याचा प्रत्यय आला. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्युएचओ) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

वॉशिंग्टन : नवीन सरकार आले की पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेले काही निर्णय बदलले जातात. जगात सर्वाधिक प्रबळ असलेल्या अमेरिकेतही सत्तांतरानंतर पहिल्या दिवशी याचा प्रत्यय आला. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्युएचओ) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी हा निर्णय पहिल्याच दिवशी बदलत ट्रम्प यांना धक्का दिला. संघटनेत पुन्हा सहभागी होण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. 

कोरोना विषाणुचा प्रसार चीनमधून जगभरात झाला होता. तरीही जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. ही संघटना चीनच्या प्रभावाखाली काम करत असून कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरली. चीनकडून संघटनेला नियंत्रित केले जात असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी मागील वर्षी एप्रिलमध्ये संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच संघटनेला दिला जाणारा निधीही थांबविला. याबाबतची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली होती. त्यानुसार हा निर्णय यावर्षी जुलै महिन्यात लागू होणार होता. 

बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांचा हा निर्णय बदलला. याबाबतच्या कार्यकारी आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केल्याने आधीचा आदेश आपोआप रद्द होणार आहे. बायडेन यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना पत्र लिहिले आहे.

अमेरिका आरोग्य संघटनेच्या सोबत राहू इच्छिते. संघटनेने कोरोना या जागितक साथीला रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी व जागतिक आरोग्य आणि आरोग्य सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अमेरिका जागतिक नेतृत्वाच्या भुमिका बजावेल, असे पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, संयुक राष्ट्राने बायडेन यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोना संकटाशी लढताना आरोग्य संघटनेच्या सोबत असणे खुप महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेकडून दरवर्षी आरोग्य संघटनेला 45 कोटी डॉलरपेक्षा जास्त निधी दिला जातो. अमेरिका 1948 पासून संघटनेचा सदस्य देश आहे.

हेही वाचा : अमेरिका "युनायटेड' - ज्यो बायडेन - कमला हॅरिस पर्वाला प्रारंभ

वॉशिंग्टन : जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि 'अमेरिकेचा आत्मा' परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उपाध्यक्षपद स्वीकारत अमेरिकेच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात केली.

दोन आठवड्यांपूर्वीच हिंसाचाराचा साक्षीदार झालेल्या 'कॅपिटॉल'मध्येच बायडेन यांच्या शपथविधीमुळे शांततेच्या नव्या पर्वाची आशा अमेरिकी नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी दिमाखदार पद्धतीने झाला. हॅरिस या पहिल्या महाला उपाध्यक्ष झाल्या आहेत. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ अमेरिकी कॉंग्रेसच्याच सदस्यांना हजर राहण्याची परवानगी होती. दरवेळी उपस्थित राहणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व व्यासपीठासमोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या अमेरिकेच्या दोन लाख राष्ट्रध्वजांनी केले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख