नितीशकुमारांचा खासदार म्हणतो, भाजपला मत देऊ नका!

बिहारच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत आघाड्यांतील बिघाडी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.
jdu mp ajay mandal says do not vote for bjp in assembly election
jdu mp ajay mandal says do not vote for bjp in assembly election

लखनौ : बिहारच्या विधानसभा निवडणूक भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) माध्यमातून लढवत आहेत. या आघाडीतील बिघाडी दिवसेंदिवस प्रकर्षाने समोर येत आहे. भागलपूरमधील जेडीयूचे खासदार अजय मंडल यांनी भाजपला मत देऊ नका, असे आवाहन मतदारांना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

अजय मंडल यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात ते भाजपला मतदान करु नका, असे म्हणत आहेत. याचबरोबर अपक्ष उमेदवार अमन कुमार यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरुन जेडीयू आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

भाजप नेते न उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी खासदार मंडल यांना इशाराही दिला आहे. याबाबत अखेर मंडल यांनी खुलासा करुन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आताच्या भाजप उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम केले नव्हते. त्यामुळे नाराज कार्यकर्ते त्यांना विरोध करीत आहेत. त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न करीत होतो. 

माझे बोलणे तोडून-मोडून सादर करण्यात आले. मी असे काहीही बोललो नाही. मी एनडीएचाच प्रचार करीत आहे. कार्यकर्ते वारंवार एकच गोष्ट सांगत असल्याने वैतागून मी त्यांना भाजपच्या ललन पासवान यांच्याऐवजी अपक्ष अमन कुमार यांना मतदान करा, असे म्हटले होते. मी ललन आणि अमन यांच्यापैकी कोणाच्याच बाजूने नसून, एनडीएच्या बाजूने आहे, असे मंडल यांनी म्हटले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे.

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com