'जेडीयू'तील बड्या नेत्याला फोडून तेजस्वी यादवांचा नितीशकुमारांना दे धक्का! - jdu leader maheshwar singh joins rjd in presence of tejashwi yadav | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

'जेडीयू'तील बड्या नेत्याला फोडून तेजस्वी यादवांचा नितीशकुमारांना दे धक्का!

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जुलै 2021

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील बड्या नेत्याला फोडले आहे. 
 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पावसान (Chirag Paswan) यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना फोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा धक्का दिला होता. पण आता नितीशकुमारांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील (JDU) बड्या नेत्याला फोडले आहे. 

बिहारच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. जेडीयू व आरजेडी एकत्रित सत्तेत असताना तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर नितीशकुमार यांनी युती तोडली होती. तेव्हापासून यादव व कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता जेडीयूचे नेते व माजी मंत्री महेश्वरसिंह हे आरजेडीमध्ये दाखल झाले आहेत. 

महेश्वरसिंह यांनी आज तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत आरजेडीमध्ये प्रवेश केला. महेश्वरसिंह यांनी 2005 च्या विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. नंतर 2010 मध्ये त्यांनी समता पार्टीच्या तिकिटावर याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. ते मंत्रीही होते. नंतर त्यांना मोठ्या पक्षाचे तिकिट न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर नाराज होते. 

हेही वाचा : पालिका आयुक्तांच्या आदेशावर पोलीस आयुक्तांची 24 तासांत कारवाई 

जेडीयूचे नेते व नितीशकुमार यांचे निकटवर्ती मंजितसिंह हेसुद्धा आरजेडीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांनी आता त्यांची मनधरणी सुरू केली आहे. जेडीयूचे नेते लेसीसिंह आणि जयकुमारसिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंजितसिंह यांना आरजेडीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावाही जेडीयूच्या काही नेत्यांनी केला आहे. 

लालू प्रसाद लवकरच परतणार
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे जवळपास चार वर्षांनंतर बिहारमध्ये एंट्री करणार आहेत. पाच जुलै रोजी आरजेडीचा स्थापनादिन असून ते या दिवशी राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लालूप्रसाद परत येणार असल्याने एनडीएमध्येही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लालूप्रसाद यांच्या आगमनावेळी जेडीयूमधील काही नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न आररेडीकडून सुरू असल्याचे समजते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख