बिहारमध्ये 'फिर से नितीशकुमार' अन् 'भाजप है तैयार'

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डिजिटल प्रचारावर भर दिला आहे.
jdu and bjp are focusing on digital campaign in bihar assembly election
jdu and bjp are focusing on digital campaign in bihar assembly election

पाटणा : बिहारमधील विधानसभेच्या २४३ जागांसाठीची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राजकीय पक्षांना प्रत्यक्ष प्रचार करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे प्रचारासाठी जास्तीत जास्त आभासी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सर्वच राजकीय पक्ष भर देत आहेत. सत्ताधारी आघाडीतील संयुक्त जनता दलाने (जेडीयू) बिहारमध्ये 'बिहार की पुकार, फिरसे नितीशकुमार', असा नारा दिला असून, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे विद्यमान मुख्यमंत्रीच असतील हे स्पष्ट केले आहे.  

बिहारमध्ये जेडीयू, भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीचे सरकार आहे. जेडीयूने अत्याधुनिक प्रचार रथ तयार केला आहे. 'बिहार की पुकार, फिरसे नितीशकुमार' अशी घोषणा त्यावर लिहिली आहे. या रथावर एलईडी स्क्रीनही बसवण्यात आला आहे. तसेच, जेडीयूने पक्ष कार्यकर्त्यांना सीडी आणि पेन ड्राइव्ह दिले आहेत. त्यात नेत्यांची भाषणे आणि हिंदी व भोजपुरीतील प्रचारगीतेही देण्यात आली आहेत. याचबरोबर पक्षाने सोशल मीडियावरही भर दिला आहे. 

प्रत्येक निवडणुकीसाठी भाजप बूथ पातळीवर  एक प्रमुख नेमून प्रचाराची धुरा सोपवते. या वेळी मात्र, व्हर्चुअल प्रचारावर भर देण्यात आला आहे. सोशल मीडियावर मोहीम आयोजित करुन जनतेशी संवाद साधला जात आहे. फेसबुक, ट्विटर व यूट्यूबवर भाजपचे 'फॉलोअर' असल्याचने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पक्ष करीत आहे.  तसेच, प्रत्येक वॉर्डसाठी एक व्हॉट्सअॅप प्रमुख निवडण्यात आला आहे. पक्षाचे ऑडिओ-व्हिडिओ संदेश, त्याबरोबर प्रचारासंबंधीची इतर माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या प्रमुखावर असेल. 

जेडीयू प्रमाणेच भाजपनेही प्रचारासाठी हायटेक प्रचार रथ तयार केला आहे. 'भाजप है तैयार, आत्मनिर्भर बिहार' अशी घोषणा त्यावर आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या भाषणासाठी हा रथ सगळीकडे फिरणार आहे. त्यावर उभे राहून नेत्यांना भाषणही करता येणार आहे. 

स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर राज्यात रोजीरोटीसाठी गेलेले मजूर बिहारमध्ये परतले आहेत. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे.  प्रश्नाचा फटका बसू नये म्हणून भाजपने गावांगावांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. राज्यातील भाजपच्या प्रत्येक खासदाराला दररोज दोन पंचायतींपर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com