शिंजो आबे यांना भारताची श्रद्धांजली; पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा

Shinzo Abe | PM Narendra Modi : शिंजो आबे हे भारताचे शुभचिंतक आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मित्र
Shinzo Abe | PM Narendra Modi
Shinzo Abe | PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : भारताचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची जपानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आबे यांच्यावर आज एका ४२ वर्षीय हल्लेखोरेने सभेदरम्यान गोळ्या घालून हल्ला केला होता. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. जपानच्या स्थानिक प्रसार माध्यमांनी याबाबातचे वृत्त दिले आहे. (Shinzo Abe Death Latest News)

शिंजो आबे हे भारताचे शुभचिंतक आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात चारवेळा भारताला भेट दिली होती. तसेच भारतातील अनेक प्रकल्पांना त्यांनी जपान सरकारच्या सहकार्याने गती देण्यात प्रयत्न केला होता. यात बुलेट ट्रेन सारख्या मोठ्या प्रकल्पाचाही समावेश आहे. आबे यांचे हेच सहकार्य लक्षात घेवून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या, ९ जुलै रोजी एक दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींकडून एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो अबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'मी माझा सर्वात चांगला आणि प्रेमळ मित्र शिंजो आबे यांच्या निधनाने दुखी झालोय. ते एक महान जागतिक नेते आणि उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी आपले जीवन जपान आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित केले. त्यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आणि मी पंतप्रधान झाल्यानंतरही आमची मैत्री कायम राहिली.

अर्थव्यवस्थेबद्दल आणि जागतिक घडामोडींबद्दल असणाऱ्या त्यांच्या ज्ञानाने माझ्यावर नेहमीच खोल छाप पाडली. नुकत्याच झालेल्या जपान भेटीत मला आबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. मात्र ही आमची शेवटची भेट असेल, याचा मी विचारही केला नव्हता. शिंजो यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी उद्या ९ जुलै २०२२ रोजी मी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतो. याद्वारे आबे यांच्याप्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in