रामविलास पासवानांना पद्मभूषण मिळाल्यानं नितीशकुमारांच्या गोटात अस्वस्थता - janta dal united is upset over bjp over padma award for ramvilas paswan | Politics Marathi News - Sarkarnama

रामविलास पासवानांना पद्मभूषण मिळाल्यानं नितीशकुमारांच्या गोटात अस्वस्थता

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जानेवारी 2021

बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. आता दोन्ही पक्षांमध्ये वादाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला आहे. 

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता केंद्र सरकारने लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर केला. यामुळे जेडीयूच्या गोटात मोठी अस्वस्थता आहे. 

रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. एलजेपीने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. याचबरोबर चिराग पासवान यांनी सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता.  

प्रजासत्ताक दिनानिमित्त जेडीयूच्या मुख्यालयात आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील व्यक्तींना पद्म सन्मान मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले. जेडीयूचे अध्यक्ष आर.सी.सिंह यांनी मात्र, यावर बोलताना यांनी पद्म सन्मान मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन. मरणोत्तर सन्मान मिळालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन असे उत्तर दिले. मात्र, त्यांनी पासवान यांचा उल्लेख टाळला. 

अखेर पत्रकारांनी रामविलास पासवान यांच्याबाबत थेट विचारणा केली. त्यावर सिंह म्हणाले की, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहू नका. पद्म सन्मानांचा पक्षाशी काय संबंध? तरुण गोगोई हे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? 

दरम्यान, जेडीयूच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बोलताना नितीशकुमार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. त्यांनी म्हटले होते की, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाला अतिशय विलंब लागला. विधानसभा निवडणुकीआधी किमान पाच महिने जागावाटप व्हायला हवे होते. याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती. परंतु, भाजप आणि आमच्या पक्षाकडून आलेल्या दबावामुळे मी हे पद स्वीकारले. 

आम्ही जेथे मागितली तेथे जनतेने आम्हाला मते दिली. जनतेच्या मनात याविषयी गोंधळ नव्हता. खरा गोंधळ आमच्याच बाजूने होता. मी आणि माझ्या पक्षाविरोधात खोटा प्रचार करण्यात आला. कोण मित्र आणि कोण शत्रू हे आम्हाला वेळीच ओळखता आले नाही. कोणावर विश्वास ठेवायचा हे सुद्धा आम्हाला कळाले नाही. आम्हाला हे कळाले त्यावेळी खूप उशीर झाला होता, असेही नितीशकुमार यांनी म्हटले होते. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह 15 मंत्र्यांनी 16 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात आहे. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख