नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर नकार

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलानंतर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत.
नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर नकार
jagdish shettar steps out of new chief ministers cabinet

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बदलानंतर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपमध्ये (BJP) जोरदार हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास आधीच नकार कळवला आहे. मुख्यमंत्री आपल्याला ज्युनिअर असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची पहिल्याच आठवड्यात अग्निपरीक्षा होणार आहे. त्यांच्यासमोर मंत्रिमंडळ स्थापनेचे आव्हान आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करीत असताना मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले आहे. मी आधी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. माझ्या जेष्ठतेचा विचार करून मी बोम्मई मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी पक्ष संघटनेचे काम करत राहीन, अशी भूमिका शेट्टर यांनी घेतली आहे. 

शेट्टर म्हणाले की, आधी मला येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागले. मी माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्यात आले. या वेळी मात्र, मी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हे माझे व्यक्तिगत मत आहे. याबाबत मला हाय कमांडकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल आणि हाय कमांडच्या कानावर या गोष्टी मी घातल्या आहेत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात हाय कमांडकडून सर्व समाजांना प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात हाय कमांडने राज्य नेत्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री बोम्मई या सूत्रानुसार यादी तयार करून हाय कमांडकडे पाठणार आहेत.  येडियुरप्पा आणि इतर नेत्यांशी चर्चा करून बोम्मई दिल्लीला जाणार आहेत. हाय कमांडकडून या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यावर नवीन मंत्रिमंडळ तयार केले जाईल. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. जुन्या मंत्र्यांना वगळून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे. राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यास कारणीभूत ठरलेल्या काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) काही आयाराम मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. 

र्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीही पुन्हा एकदा सर्वांनाच धक्का देत मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये फारसे चर्चेत नसलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. बोम्मई हे कर्नाटकचे विसावे मुख्यमंत्री ठरले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in