खबरदार, अशास्त्रीय माहिती पसरवू नका! 'एम्स'च्या प्रमुखांना 'आयआरआयए'चा इशारा - iria warns aiims director randeep guleria over ct scan remark | Politics Marathi News - Sarkarnama

खबरदार, अशास्त्रीय माहिती पसरवू नका! 'एम्स'च्या प्रमुखांना 'आयआरआयए'चा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 मे 2021

रुग्णालये सर्वच रुग्णांसाठी सीटी-स्कॅन आणि बायोमार्करचा सर्रास वापर करीत आहेत. या गैरवापराबद्दल डॉ.रणदीप गुलेरिया यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. 
 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (covid) रुग्णसंख्येत वेगाने वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. रुग्णालये सर्वच रुग्णांसाठी सीटी-स्कॅन (ct-scan) आणि बायोमार्करचा सर्रास वापर करीत आहेत. या गैरवापराबद्दल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. याला इंडियन रेडिओलॉजीकल अँड इमेजिंग असोसिएशनने (आयआरआयए) आक्षेप घेत गुलेरियांना इशारा दिला आहे. (iria warns aiims director randeep guleria over ct scan remark)

आयआरआयएने म्हटले आहे की, एवढ्या ज्येष्ठ डॉक्टरकडून अशी अशास्त्रीय माहिती पसरवली जात असल्याने आम्हाला दु:ख झाले असून, आम्ही निराशही झालो आहोत. कोरोनाच्या निदानात सीटी-स्कॅन हे अतिशय महत्वाचे असते. आरटी-पीसीआर टेस्टमध्ये काही वेळा पॉझिटिव्ह असूनही म्युटंट प्रकार अथवा तांत्रिक चुकांमुळे निदान निगेटिव्ह होते. यावेळी सीटी-स्कॅन अतिशय महत्वाचे ठरते. सौम्य, मध्यम अथवा तीव्र संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये सीटी-स्कॅन अतिशय महत्वाची भूमिका बजावते. 

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले होते की, सध्या सीटी-स्कॅन आणि बायोमार्करचा गैरवापर सुरू आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे सीटी-स्कॅन करण्याची कोणतीही गरज नाही. एक सीटी-स्कॅन हे छातीच्या 300 ते ४०० एक्स-रेएवढे असते आणि ते अतिशय घातक असते. 

हेही वाचा : महाराष्ट्रातला कोरोना विषाणू दक्षिणेत घालतोय धुमाकूळ 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी लस घेण्याविषयी ते म्हणाले होते की, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी लशीचे दोन्ही डोस घ्यावेत, अशी शिफारस आम्ही सध्या करीत आहोत. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पहिला डोस हा प्रायमिंग आहे तर दुसरा डोस हा बूस्टर डोस आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 980 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 12 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 980 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 165 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 10 लाख 77 हजार 410 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 959 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 35 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 35 लाख 66 हजार 398 आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख