मला नाही तर तुम्ही तपासालाच क्वारंटाईन केले; आयपीएस अधिकारी तिवारींचा आरोप

अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. आता या प्रकरणी सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीस सुरूवात केली आहे.
ips officer vinay tiwari slams mubai police and maharashtra government
ips officer vinay tiwari slams mubai police and maharashtra government

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी आज पाटण्याला परत गेले आहेत. तिवारी यांना पाटण्याहून मुंबईत तपासासाठी आल्यानंतर मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले होते. या मुद्द्यावरून बिहार पोलिस  आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये जुंपली होती. या प्रकरणी तिवारी यांनी आता मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. 

मुंबई महापालिकेने मला मेसेज पाठवला असून मी क्वारंटाइनच्या बाहेर जाऊ शकतो, असे कळवले आहे. मी लगेचच पाटण्याला रवाना होत आहे, असे विनय तिवारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. तिवारी यांना सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ऑनलाइन तपास करण्याची  परवानगी मुंबई महापालिकेने काल दिली होती. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तसे पत्र बिहारच्या पोलिस महानिरिक्षकांना पाठवले होते. मात्र, तिवारी आता पाटण्याला परत गेले आहेत. 

पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले होते. या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास ते करत आहेत. तिवारी मुंबईत आल्यावर लगेचच मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाइन केले. यावरुन राजकीय वादंग सुरु  झाला होता. महाराष्ट्र विरुद्ध बिहार असे चित्र यातून निर्माण झाले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

तुमचा अधिकारी झूम, गुगल मिट किंवा जिओ मिट अशा माध्यमांद्वारे आपले कामकाज सुरु ठेऊ शकतात, असे महापालिकेने बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. दरम्यान, विनय तिवारी यांना महापालिकेने क्वारंटाईन मधून सोडले नसते तर बिहार पोलिस त्यांच्या महाअधिवक्‍त्यांचे मत जाणून घेऊन न्यायालयात जाण्याच्या विचारात होते. 

पाटण्याला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाताना पुरेशी काळजी घेण्याची सूचनाही मुंबई महापालिकेने तिवारी यांनी केली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट वापरण्याची सूचनाही महापालिकेने तिवारी यांनी केली होती. पाटण्याला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तिवारी यांनी मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की, मी असे म्हणेन की मला क्वारंटाईन करण्यात आलेले नव्हते. बिहार पोलिसांच्या तपासालाच क्वारंटाईन करण्यात आले होते. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com