टोकियोतील विधानसभेच्या रिंगणात उतरले मराठमोळे योगेंद्र पुराणिक!

टोकियोमधील विधानसभा निवडणूक लढण्याठी मराठमोळे योगेंद्र पुराणिक मैदानात उतरले आहेत.
indian origin yogendra punekar contesting state assembly election in tokyo
indian origin yogendra punekar contesting state assembly election in tokyo

पुणे : जपानमधील टोकियोतील (Tokyo) विधानसभा निवडणुकीच्या मैदानात योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) उतरले आहेत. ते मूळचे पुणेकर आहेत. ही निवडणूक लढवणारे ते पहिलेच भारतीय नव्हे तर, पहिले आशियायी व्यक्तीही ठरले आहेत. त्यांचा आता जोरदार प्रचार सुरू आहे. (indian origin yogendra puranik contesting state assembly election in tokyo) 

जपानमधील एदुगवा हे सात लाख लोकसंख्येचे शहर. त्या शहरातील सिटी असेंम्ब्लीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही पुराणिक यांनी विजय मिळवला होता. आता ते टोकियो असेंम्ब्लीची निवडणूक लढवत आहेत. हे मतदान ४ जुलैला होणार आहे. जपानमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉन्स्टिट्यूशन पार्टीने चार वेळा सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना २० एप्रिलला उमेदवारी जाहीर केली. पुराणिक आता प्रचारासाठी अगदी सकाळी ६ वाजताही रेल्वे स्थानकावर पोचतात अन वृत्तपत्रांतून पत्रके पाठवितात. सुमारे ४ लाख ५० हजार मतदार असलेल्या या शहरातून विजयी होण्यासाठी पुराणिक यांना किमान ४० हजार मते आवश्यक आहेत. येथे भारतीय मतदार आहेत केवळ ७ आहेत. 

पुराणिक यांचा जन्म अंबरनाथ येथे झाला. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस. पी. महाविद्यालयामध्ये घेतले. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केले. याच काळात  त्यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील परकीय भाषा विभागातून जपानी भाषेचे धडे गिरविले. तसेच, आयटी़चे काही अभ्यासक्रम पूर्ण केले. शिष्यवृत्ती मिळाल्यावर पहिल्यांदा एक महिन्यांसाठी तर नंतर एक वर्षासाठी ते जपानला गेले होते. 

पुराणिक यांना जपान भावला अन ते तिथेच स्थायिक झाले. ते २० वर्षांपासून जपानमध्ये राहत असल्यामुळे ते आता अधिकृत जपानी नागरिक आहेत. आयटीनंतर बँकेत नोकरी करून ते आता हॉटेल व्यवसायात रमले आहेत. मराठमोळे खाद्यपदार्थ देणारे रेखा - इंडियन होम फूड हे हॉटेल त्यांनी एदुगवामध्ये उघडले असून आता योगी हे त्यांचे दुसरे हॉटेलही लवकरच सुरू होणार आहे. पुराणिक यांची ६५ वर्षांची आई रेखा या त्यांच्यासोबतच जपानमध्ये राहतात तर १८ वर्षांचा मुलगा चिन्मय हा ब्रिटनमध्ये शिक्षण घेतो.

या विषयी बोलताना पुराणिक म्हणाले की, जपानमध्ये जपानी भाषा अतिशय महत्त्वाची आहे. इंग्रजीत फारसे कोणी बोलत नाही. त्यामुळे जपानी भाषा यायलाच हवी. निवडणूक लढण्यासाठी जपानमधील नियम कोटेकोर आहेत. त्यानुसारच प्रचार करावा लागतो आणि जपानी शिष्टाचार महत्त्वाचे ठरतात. भारतासारखे नगरसेवक, आमदार आणि खासदार हे टप्पे जपानमध्ये आहेत. या निवडणुकीत विजयी झाल्यावर खासदार म्हणजेच नॅशनल असेंब्लीमध्येही पोचण्याचा माझा प्रयत्न असेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com