कोरोना लसीकरणात भारताचा जगात तिसरा क्रमांक; केंद्रीय मंत्र्याचा दावा - india at third position globally in covid vaccination says g kishan reddy | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

कोरोना लसीकरणात भारताचा जगात तिसरा क्रमांक; केंद्रीय मंत्र्याचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. लशीची टंचाई निर्माण झाल्याने या मोहिमेला ब्रेक लागला आहे. असे असतानाही जगात कोरोना लसीकरणात भारताचा (India) तिसरा क्रमांक असल्याचा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी केला आहे. 

देशात आतापर्यंत 21 कोटी 85 लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे, असे सांगून रेड्डी म्हणाले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण मोहीम व्यापक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट्य सरकारने ठरवले आहे. 

हेही वाचा : लसीकरण धोरणावरुन केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले 

सरकारने 250 कोटी डोसचे उत्पादन करण्यासाठी कृती आराखडा आखला आहे. याचबरोबर सरकार लस आयात करत आहे. देशात लशीची सर्वाधिक आयात 1 जूनला झाली. काल देशाला 56.6 टन रशियाच्या स्पुटनिक व्ही लस मिळाली. फायजर आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून लस मिळवण्याबाबतही चर्चा सुरू आहे.  पुढील सात ते आठ महिन्यांत सर्वांचेच लसीकरण झालेले असेल, असे रेड्डी यांनी सांगितले. 

देशात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख