Corona Alert : महाराष्ट्रासह 10 राज्यांतच कोरोनाचे 71 टक्के नवे रुग्ण - in india ten states account for over 71 per cent of new COVID 19 cases | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

Corona Alert : महाराष्ट्रासह 10 राज्यांतच कोरोनाचे 71 टक्के नवे रुग्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 57 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दर तासाला सुमारे 143 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशात महाराष्ट्रासह 10 राज्यांतच कोरोनाचे 71 टक्के नवे रुग्ण सापडत आहेत. (ten states account for over 71 per cent of new COVID 19 cases)

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 2 लाख 82 हजार 833 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 22 हजार 408 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 57 हजार 229 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा : अदर पूनावाला करणार ब्रिटनमध्ये 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक 

महाराष्ट्रात मागील 24 तासांत सर्वाधिक 48 हजार 621 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 44 हजार 438 आणि उत्तर प्रदेशमध्ये 29 हजार 52 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल. आंध्र प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांच्या समावेश आहे. तसेच, देशातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये 73.15 टक्के या राज्यांतील आहेत. दिलाशाची बाब म्हणजे या बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही या दहा राज्यांत अधिक असून, हे प्रमाण 73.14 टक्के आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 47 हजार 133 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.91 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख