गेहलोत यांचा पायलट यांच्यावर नवा डाव; पक्षनेतृत्वालाही पकडलं कात्रीत

राजस्थान काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
गेहलोत यांचा पायलट यांच्यावर नवा डाव; पक्षनेतृत्वालाही पकडलं कात्रीत
Independent mlas supporting ashok gehlot to meet in rajasthan

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. मागील काही दिवसांपासून पायलट हे आक्रमक झाल्याने पक्ष नेतृत्व त्यांच्या बाजूला झुकल्याचे चित्र आहे. यामुळे मुख्यमंत्री गेहलोत यांनी नवा डाव टाकला आहे. त्यांनी यासाठी अपक्ष आमदारांसह पक्षाच्या सहयोगी आमदारांना यासाठी हाताशी धरण्याची खेळी खेळली आहे. 

पक्ष नेतृत्वाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे पायलट यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. यानंतर पक्ष नेतृत्वाने पायलट यांच्या कलाने घेण्यास सुरवात केली आहे. यामुले गेहलोत यांच्या कंपूत नाराजी निर्माण झाली आहे. पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी गेहलोत यांनी आता सहयोगी आणि अपक्ष आमदारांना हाताशी धरण्याची खेळी खेळली आहे. 

सरकारला  पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक आज बोलावण्यात आली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत सरकारला पाठिंबा देणारे 13 अपक्ष आमदार आणि बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले 6 आमदार उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. हे सर्व आमदार गेहलोत गटाचे आहेत. पायलट यांनी केलेल्या बंडावेळी हे सर्व आमदार गेहलोत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. 

राज्य सरकारने अनेक महामंडळांवरील नियुक्त्या सुरू केल्या आहेत. याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराच्याही हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे. या बैठकीबद्दल अपक्ष आमदार राजकुमार गौर म्हणाले की, अपक्ष आमदारांची बैठक अनेक दिवसांपासून झालेली नव्हती. सर्व आमदार भेटून राज्यातील चालू परिस्थितीवर चर्चा करतील. 

पायलट यांच्या गटातील आमदारांना जास्तीतजास्त प्रतिनिधित्व मंत्रिमंडळ आणि महामंडळांमध्ये मिळावे, अशी मागणी होत आहे. यातच बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांनीही पक्षाच्या नेतृत्वाकडे काही मागण्या केल्या आहेत. मागील वर्षीपासून त्यांना काहीही मिळाले नाही, अशी या आमदारांची नाराजी आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षी पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

Related Stories

No stories found.