निवडणूक चार दिवसांवर अन् विरोधी पक्षनेत्याच्या जावयावर प्राप्तिकरचे छापे

निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले.
income tax department searches at m k stalin son in law
income tax department searches at m k stalin son in law

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना आज द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकला केंद्रीय यंत्रणांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यानंतर होऊ लागला आहे. 

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी चेन्नईत आठ ठिकाणी छापे मारले. यात स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारण्यात आले. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन यांच्या मुलीच्या तेनायमपेट आणि नीलनगराई येथील घरांवर छापे मारण्यात आले. स्टॅलिन यांचे जावई सबारीसन यांच्याशी निगडित अनेक ठिकाणीही छापे मारण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी मोठी रोख रक्कम ठेवण्यात आल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली. 

सबारीसन यांचे सहकारी कार्तिक आणि बाला यांच्या घरावरही छापे मारण्यात आले. द्रमुकचे अण्णानगरमधील उमेदवारांचा कार्तिक हा मुलगा आहे. सबारीसन हे द्रमुकचे व्यूहरचनाकार आणि स्टॅलिन यांचे सल्लागार आहेत. यामुळे त्यांच्यावरील कारवाईने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

तमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी आणि निकाल हे २ रोजी आहेत. राज्यात ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. जनमत चाचण्यांचा कल द्रमुकच्या बाजूने असून, मुख्यमंत्रिपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाला पसंती मिळत आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीने निवडणुकीसाठी आणखी ताकद लावली आहे. 

याआधी राजांना आयोगाचा दणका 
तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या टिप्पणीमुळे जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विविध पक्षांच्या नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर निवडणूक आयोगाने या प्रकरणी द्रमुकचे नेते ए.राजा यांना मोठा दणका  दिला आहे. 

राजांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे खुलासा मागितली होता. आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याबद्दल राजांनी केलेले विधान असभ्य असून, मातृत्वाचा अपमान करणारे आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याने आयोगाने राजांना 48 तास प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com