उत्तर प्रदेशातील 52 टक्के जनता म्हणतेय, फिर एक बार योगी सरकार! - ians c voter survey predicts yogi adityanth win in utter pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेशातील 52 टक्के जनता म्हणतेय, फिर एक बार योगी सरकार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुढील वर्षी विधानसभा निवडणुका (Assembly Election) होत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. आता एका सर्वेक्षणात पुढील निवडणुका योगींच्या नेतृत्वाखाली भाजप जिंकणार असा कल 52 टक्के जनतेने व्यक्त केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 312 जागा मिळवल्या होत्या. समाजवादी पक्षाला 47, बहुजन समाज पक्षाला 19 आणि काँग्रेसला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या. भाजपला मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. आयएएनएस - सी व्होटर यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे मत 52 टक्के जनतेने व्यक्त केले आहे. याचवेळी आदित्यनाथ हे पुन्हा सत्तेत येणार नाही, असे मत 37 टक्के जनतेने व्यक्त केले आहे. 

उत्तर प्रदेश पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेची मुदत पुढील वर्षी 14 मार्चला संपत आहे. कोरोना संकट हाताळणीवरुन योगी सरकारला विरोधक लक्ष्य करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने पंचायत निवडणुका घेतल्याने त्यासाठी तैनात केलेल्या हजारो कर्मचारी आणि शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे राज्यातील जनतेत सरकारबद्दल नाराजी असून, ती कमी भाजपने पावले उचरली आहेत.  

हेही वाचा : न्यायालयात आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजप खासदार लग्नात नाचताना दिसल्या 

 देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच महत्वाची ऑनलाइन बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती. 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा होती. परंतु, योगींना बदलण्यास पक्षाने नकार दिला आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनाही बदलण्यात येणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख