उच्च न्यायालय म्हणाले, सुशांत हा तर निष्पाप अन् अतिशय चांगला माणूस दिसत होता... - high court says actor sushant singh rajput was innocent and sober | Politics Marathi News - Sarkarnama

उच्च न्यायालय म्हणाले, सुशांत हा तर निष्पाप अन् अतिशय चांगला माणूस दिसत होता...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गूढ साडेसहा महिन्यानंतरही कायम आहे. याप्रकरणी सीबीआयने अद्याप तपास अहवाल जाहीर केलेला नाही. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे साडेसहा महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सुशांतच्या दोन बहिणींविरुद्ध रिया चक्रवर्तीने दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याचबरोबर न्यायालयाने सुशांतविषयी निरीक्षणही नोंदवले आहे. 

सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने त्याची बहिणी प्रियांका आणि मितू यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. सुशांत याला नैराश्यविरोधी औषधे देण्यासाठी खोटे प्रिस्क्रिप्शन मिळवल्याप्रकरणी सुशांतच्या बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात तिने हा एफआयआर दाखल केला होता. त्यांनीच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप रियाने केला होता. मुंबई पोलिसांनी हा एफआयआर दाखल करुन तो सीबीआयकडे वर्ग केला होता. 

सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं अखेर तोंड उघडलं..तपासाबाबत केला मोठा खुलासा

हा एफआयआर रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका सुशांतच्या बहिणींनी उच्च न्यायालयात केली होती. यावर सुनावणी झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाने आठवडाभरात सर्व पक्षांना लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या वेळी उच्च न्यायालयाने सुशांतबद्दलही निरीक्षण नोंदवले. न्यायालय म्हणाले की, त्याच्या चेहऱ्यावरुन तो निष्पाप आणि विचारी वाटत होता. याचबरोबर तो अतिशय चांगला माणूसही वाटत होता. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख