रिया अन् शौविकची जामिनासाठी प्रतीक्षा कायम - high court reserves order on rhea chakraborty and showik chakraborty | Politics Marathi News - Sarkarnama

रिया अन् शौविकची जामिनासाठी प्रतीक्षा कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्जचा अँगल समोर आला असून, याचा तपास एनसीबी करीत आहे. एनसीबीने या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह 18 जणांना अटक केली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. या दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले आहे. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. तेव्हापासून न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ती सध्या भायखळा कारागृहात आहे. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश एस.व्ही कोतवाल यांनी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे रिया आणि शौविकला जामिनासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एनसीबीने आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख