कंगनाला धक्का...उच्च न्यायालयाचा तातडीने दिलासा देण्यास नकार - high court refuse to grant relief to actress kangana ranaut | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाला धक्का...उच्च न्यायालयाचा तातडीने दिलासा देण्यास नकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

अभिनेत्री कंगना राणावतला तातडीने दिलासा देण्यास आज उच्च न्यायालयाने नकार दिला. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) तातडीने दिलासा देण्यास आज उच्च न्यायालयाने (High Court) नकार दिला. अर्ज सुनावणीची एवढीच घाई होती तर यापूर्वीच याचिका का केली नाही, असा सवालही खंडपीठाने कंगनाला केला. यामुळे कंगनाच्या धाकड (Dhaakad) चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

धाकड चित्रपटाचे चित्रीकरण हंगेरीमध्ये होणार आहे. या चित्रीकरसाठी जून ते ऑगस्ट कालावधीत कंगनाला हंगेरीमध्ये जायचे आहे. परंतु, तिच्या पासपोर्टची मुदत सप्टेंबरपर्यंतच आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांना परत येण्यापासून सहा महिने पासपोर्ट वैध असावा लागतो. त्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट  केल्यामुळे कंगनावर गुन्हे दाखल झाले आहेत. वांद्रे पोलिसांनी यामध्ये देशद्रोहाचा आरोपही तिच्यावर ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट प्राधिकरणाने नूतनीकरण केले नाही, असे कंगनाने म्हटले आहे. 

या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकेत पासपोर्ट कार्यालयाला प्रतिवादी का केले नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तसेच, पासपोर्ट अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला का याचाही उल्लेख याचिकेत नाही, असे खंडपीठाने नमूद. यावर पासपोर्ट प्राधिकरण अधिकाऱ्यांनी तोंडी आक्षेप घेतला होता, असे कंगनाच्या वकिलांनी सांगितले. 

हेही वाचा : चिराग पासवानांनी बाजी काकांवर उलटवली 

यावर पासपोर्ट अधिकाऱ्यांचा लेखी आक्षेप नसेल आणि पासपोर्ट विभाग प्रतिवादी नसेल तर आदेश कुणाला देणार, असे खंडपीठाने सुनावले. या याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी कंगनाच्या वकिलांनी केली. हंगेरीत चित्रीकरण रखडले असून, सर्व कलाकार, कर्मचारी तिथे पोचले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावर चित्रीकरणाच्या तारखा पुढेही मिळतील आणि एवढी घाई होती तर यापूर्वी याचिका करायला हवी होती. त्यामुळे चित्रीकरणाचे कारण देऊ नका, असे खंडपीठाने बजावले. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ जूनला होणार आहे.

कंगनाच्या याचिकेत बहीण रंगोली चंडेल हिचेही नाव जोडले आहे. याबद्दल न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. रंगोली यांचे नाव का जोडले आहे, त्यांनाही व्यावसायिक कामासाठी जायचे आहे का, त्यांचा या अर्जाशी काय संबंध, असा प्रश्न खंडपीठाने केला. याबद्दल याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभाही खंडपीठाने दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख