कंगनाला अटकेपासून संरक्षण देत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुनावले... - high court gave kangana ranaut and her sister protection from arrest | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाला अटकेपासून संरक्षण देत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुनावले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळून लावली. मात्र, याचवेळी कंगनावरील देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्या दोघींनी भावाचे लग्नाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या समन्सला त्यांनी उत्तरच दिले नव्हते. 
 
मुंबई पोलिसांनी त्या दोघींना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यांना २३ व २४ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. कंगना आणि रंगोलीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. कंगना आणि रंगोलीने तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजेरी लावली नाही याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

भावाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलो होतो, हे कारण न्यायालयाने अमान्य केले. काहीही कारण असले तरी समन्स बजावल्यानंतर त्याचे पालन करायलाच हवे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  

कंगनावरील देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. देशातील नागरिकांना तुम्ही अशी वागणूक देता का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास कंगना आणि रंगोलील काही कालावधी देत न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. या दोघी 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर हजर राहतील. 

या दोघींना अटकेपासून संरक्षण हवे असेल तर त्यांनी तातडीने चौकशीसाठी हजर राहावे. त्यांना विशेष वागणूक का आणि जानेवारीपर्यंत त्यांना मुदत का, असे  म्हणणे मुंबई पोलिसांच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख