राज्यात अनेक हत्ती अन् वाघ, हायकमांडने ठरवावे मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य! - High command will decide which elephant is suitable for CM post says Minister C P Yogeshwar | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात अनेक हत्ती अन् वाघ, हायकमांडने ठरवावे मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी भाजपमधीलच काही आमदार व मंत्र्यांनीही आघाडी उघडली आहे.

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, यासाठी भाजपमधीलच काही आमदार व मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्याविरोधात आघाडी उघडली आहे. एका मंत्र्याने तर येडियुरप्पा यांचा उल्लेख थेट हत्ती असा केला आहे. (High command will decide which elephant is suitable for CM post says Minister C P Yogeshwar)

कर्नाटकमधील मंत्री सी. पी. योगेश्वर यांच्याकडून येडियुरप्पा यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडून सरकारी कामकाजात सातत्याने ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना मंत्री योगेश्वर म्हणाले, आता बदल गरजेचा आहे. आम्ही हत्तीच्या मुलाला (बी. वाय. विजयेंद्र) अंबारीवर (मुख्यमंत्रीपद) बसू देणार नाही. 

हेही वाचा : सरनाईक कुटूंबाला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ईडीला दिले हे आदेश

आपल्याकडे हत्ती व वाघांची संख्या (मुख्यमंत्री पदासाठी योग्य) खूप आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणता हत्ता अधिक योग्य आहे, याचा निर्णय हायकमांड घेतली. आम्ही मुख्यमंत्री पदाचा आदर करतो, पण व्यक्तीचा नाही, असं म्हणत योगेश्वर यांनी येडियुरप्पा यांना हटवण्यासाठी आघाडी उघडली. 

दरम्यान, आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांनी येडियुरप्पांच्या विरोधात उघड बंड पुकारले आहे. नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा येडियुरप्पांवर हल्लाबोल केला. म्हैसूरमधील चामुंडा हिल्सवरील चामुंडेश्वरीचे दर्शन यतनाळ यांनी घेतले. त्यावेळी त्यांनी आपलेच सरकार भ्रष्टारात गुंतले असल्याचा घरचा आहेर दिला. कर्नाटकात भाजपला वाचवायचे असेल तर मुख्यमंत्रिपदावरुन येडियुरप्पांना हटवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

यतनाळ म्हणाले की, दुष्टांचा संहार करावा, यासाठी मी चामुंडेश्वरीला साकडे घातले आहे. राज्यातील स्थितीवर पक्षश्रेष्ठींचे बारकाईने लक्ष आहे. लवकरच राज्यातील नेतृत्वाबाबत पक्षाकडून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे. याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉइंग रुममध्ये होत आहे. गुन्हे शाखेकडून तेथे छापे मारले जात नाहीत.  

हेही वाचा : नारायण राणे दिल्लीला गेले अन् मंत्रीमंडळ विस्ताराची बैठकच झाली रद्द

कर्नाटकचे मंत्री बी.श्रीरामलू यांचे सहकारी राजन्ना यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. मुख्यमंत्र्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली होती. येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कर्नाटक सरकारमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षाचा संबंध या कारवाईशी जोडला जात आहे. 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख