नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक आहे. त्यांची तब्येत आणखी ढासळू लागल्याने त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने हलवण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, झारखंड उच्च न्यायालयात लालूंच्या जामिनावर आजही निर्णय झाला नाही.
लालू हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. लालूंची तब्येत 23 जानेवारीला आणखी ढासळल्याने त्यांना 'एम्स'मध्ये हलवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर त्या दिवशी सायंकाळी लालूंना 'एम्स'मध्ये हलवण्यात आले.
लालूंना 'एम्स'मधील 'कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लालूंसोबत त्यांच्या कन्या मिसा भारती या आहेत. लालूंना तेथे दाखल केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
लालूंच्या जामिनावर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयाकडून आणखी वेळ मागून घेतला. यावर न्यायालयाने सीबीआयने सीबीआयला लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत लालूंच्या जामिनाचा फैसलाही पुढे ढकलला गेला आहे.
लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नुकताच लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.
लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. रीम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले होते.
चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Edited by Sanjay Jadhav

