युरोपीय देशांनी वापर थांबवूनही भारतात 'सिरम'ची कोरोना लस राहणार सुरूच

भारतात कोरोनासाठी वापरण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचा वापर अनेक देशांनी थांबवला आहे.
health ministry will not stop use covishield vaccine in india
health ministry will not stop use covishield vaccine in india

नवी दिल्ली : लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे कारण देत जर्मनी, फ्रान्स आणि इटली या बड्या युरोपियन देशांनी ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. कोव्हिशिल्डचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने मात्र, देशात या लशीचा वापर सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर थांबवला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला आहे. भारतात मात्र, कोव्हिशिल्ड लशीमुळे असा प्रकार झालेला आढळलेला नाही. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी संपर्क साधूनही विचारणा करण्यात आली होती. सर्वांनीच असा प्रकार घडला नसल्याचे कळवले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या समितीची एक-दोन दिवसांत बैठक होणार आहे. या बैठकीत लशीचा दुष्परिणामांचे पुरावे पाहूनच तिच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मागील वर्षभरापासून जगभरात कोरोनाने आतापर्यंत सुमारे २६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अमेरिकेसह अनेक विकसित देशांना मोठा झटका बसला आहे. या महामारीला रोखण्यासाठी लसीकरणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार भारतासह बहुतेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड ही कोरोना लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या तयार होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर काही देशांनी या लसीचा वापर थांबविला आहे.

जागतिक आरोग्य संघटना, अॅस्ट्राझेनेका यांनी याबाबतीत तपासणी केल्यानंतर स्पष्ट केले आहे की, लस सुरक्षित असून त्यामुळे रक्तात गुठळ्या होत नसल्याचे आढळले आहे. गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप आढळून आलेला नाही. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहीम पुढेही सुरु ठेवणे महत्वाचे आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. 

यापूर्वी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनीही लशीचा वापर थांबवला आहे. त्यानंतर आता जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला आहे. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे. 

भारतामध्ये अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, भारतात या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे भारतातील लसीकरण सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतात कोव्हॅक्सिन या लसीचा वापरही होत आहे. दोन्ही लसींच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com