हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची कैफियत उच्च न्यायालय ऐकणार - hathras victims family will be presented before high court tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची कैफियत उच्च न्यायालय ऐकणार

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा हाथसरमधील अत्याचार प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे. 

लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतला आहे. सीबीआयने आज या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी पीडितेचे कुटुंबीय उद्या (ता.12) उच्च न्यायालयासमोर हजर राहणार आहेत. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर उद्यापासून (ता.१२) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीस पीडितेचे कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीला पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. 

आज दुपारपर्यंत याबाबतचा कोणताही अधिकृत निरोप मात्र पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोचलेला नव्हता. पीडितेच्या कुटुंबीयांनी आज रात्री घरातून बाहेर पडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असून, जिवाला धोका असल्याने रात्री घर सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे उच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्या सकाळीच ते घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सरकारने पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणासाठी 60 पोलीस तैनात केले आहेत. याचबरोबर पीडितेच्या घराभोवती आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करुन सीबीआयकडे तपास सोपवला आहे. आता सीबीआयने हा तपास हाती घेतला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख