काँग्रेसमधील कुरघोड्या संपेनात; पक्षाचे प्रभारी म्हणाले, सर्व वाद मिटलेच नाहीत!

काँग्रेसमधील कुरघोड्या संपल्याचे मानले जात असताना पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी मात्र, याचा इन्कार केला आहे. यामुळे काँग्रेसधील वाद धुमसत असल्याचे समोर आले आहे.
harish rawat says there are still some issues in punjab congress
harish rawat says there are still some issues in punjab congress

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यातील वाद अखेर शमला आहे. सिद्धू यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर राज्यातील काँग्रेसमधील कुरघोड्या संपल्याचे मानले जात असताना पक्षाचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी मात्र, याचा इन्कार केला आहे. यामुळे काँग्रेसधील वाद धुमसत असल्याचे समोर आले आहे. 

पंजाब काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीन सदस्यीय समिती नेमली होती. यात पक्षाचे पंजाब प्रभारी रावत यांचा समावेश होता. पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वादावर रावत म्हणाले की, वादाच्या सर्व मुद्द्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. पंजाबमधील पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व असलेले अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांना हे मिटवून 2022 मधील विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जायला हवे हे कळते. इतिहासाने आमच्यावर पंजाबमधील निवडणूक जिंकण्याची जबाबदारी टाकली आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचबरोबर सिद्धू यांनीही उमदेपणा दाखवून मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद मागितले. भविष्यात हे असेच सुरू राहील, अशी आशा आहे, असेही रावत यांनी सांगितले. 

सिद्घू यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत चार कार्याध्यक्षांनीही पदभार स्वीकारला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती. जनतेकडून सिद्धू यांच्या नावाच्या सुरू असलेल्या गजरात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. सिद्धू यांनी अतिशय जोरदारपणे नवी इनिंग सुरू केली आहे. आधीचा संघर्ष मागे सोडून पुढे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी केला. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू होता आणि नंतर सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

हेही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदीसाठी आजी व माजी केंद्रीय मंत्री शर्यतीत 
 
सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याआधी मुख्यमंत्र्यांनी पंजाब भवनमध्ये चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तब्बल चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री आणि सिद्धू यांची भेट घडली होती. त्या वेळी केवळ मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनाच प्रवेश दिला गेला होता.  सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रित चहा घेतला होता. पंजाबचे प्रभारी हरीश रावत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी, प्रतापसिंग बाजवा आणि लालसिंग हे सुद्धा उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com