BJP Politics: मोदी-शाह यांचे ‘प्रो इन्कंबन्सी‘ चे नवे समीकरण ; ऐतिहासिक विजयाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये

Gaujrat Election Result 2022 : सरकारच्या बाजूने कौल, हे नवे समीकरण रूढ करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत व त्यांच्यादृष्टीने स्व-राज्य गुजरात ही त्याची ‘प्रयोगशाळा‘ ठरणार आहे.
Narendra Modi, Amit Shah, Latest News
Narendra Modi, Amit Shah, Latest NewsSarkarnama

Gaujrat Election Result 2022 : भाजपने गुजरातमध्ये इतिहास रचला. ब्रँड मोदींच्या प्रभावामुळे भाजपने १८२ पैकी १५६ (८६%) जागा जिंकल्या. राज्याच्या ६२ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाने एवढा प्रचंड विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात रोष (अँटी इन्कबन्सी) दिसला नाही. कारण भाजपने गत निवडणुकीत जिंकलेल्या ९२ जागाही यंदा पुन्हा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष फक्त १७ ठिकाणी जिंकू शकला. १० टक्केही जागा मिळाल्या नसल्याने काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळणेही अवघड आहे. आपने केवळ ५ जागा जिंकल्या मात्र त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळेल.

सत्तारूढ असण्याच्या विरोधात जातील असे अनेक मुद्दे असूनही गुजरातचा ‘गड' राखणेच नव्हे तर आणखी भक्कम करणे ही किमया भाजपने नरेंद्र मोदी या साडेचार अक्षरांच्या जादूने गुजरात राज्यात केली. २०१७ मधील ७७ जागांवरून भाजपच्या ‘ब्रॅंड मोदी‘ ने १५४ जागांवर झेप घेताना कॉंग्रेसचा पालापाचोळा करून टाकला. हे यश अनेक अर्थांनी लक्षणीय ठरते.

मोदींचा गुजराती जनतेवरील करिष्मा असा की भाजपने १२७ जागांचा आपलाच विक्रम मोडावा ही त्यांची इच्छा मुख्यतः मध्यमवर्गीय आणि शहरी गुजराती जनतेने भरभरून पूर्ण केली. राजकारणात सतत सत्तेवर राहणाऱया पक्षाला ‘ॲंटी इन्कंबन्सी‘ म्हणजेच सरकारविरोधी भावनेचा सामना करावा लागतो. मोदी-शहा यांनी आता ‘प्रो इन्कंबन्सी‘ म्हणजे सरकारच्या बाजूने कौल, हे नवे समीकरण रूढ करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत व त्यांच्यादृष्टीने स्व-राज्य गुजरात ही त्याची ‘प्रयोगशाळा‘ ठरणार आहे.

Narendra Modi, Amit Shah, Latest News
Sharad Pawar : पवारांच्या मध्यस्थीमुळे दोन संघटनांमधील 'कुस्ती' बरोबरीत सुटली..; लांडगे आखाड्याबाहेर !

मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ज्या माधवसिंह सोळंकी यांचा १४९ जागांचा विक्रम मोडला त्या सोळंकी यांनी तेव्हा खाम (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) अशी मोट बांधली होती. मोदींनी आपल्या काळात आदिवासी मतदारांशी भक्कम नाते जोडताना पटेल, बनिया, जैन, दलित आणि ब्राह्मण समाजांना भक्कमपणे बांधून ठेवले. गुजरातेतील मोठ्या शहरांमध्ये या जातींचाच प्रभाव आहे. शहरेच गुजरातेतील व्यवसाय व अन्य घटकांवरही नियंत्रण ठेवतात.

Narendra Modi, Amit Shah, Latest News
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल 'या' वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत ; महिलेनं त्याचं भाषण थांबवलं..

गुजरातेत मध्यमवर्गीय आणि शहरी भागाचा प्रभाव मोठा आहे आणि या वर्गावर नरेंद्र मोदींच्या नावाची जादू कायम आहे. मोदींनी ही निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची केली. अहमदाबादचा ५ किलोमीटरचा मेगा रोड शो असो की विक्रमी संख्येने घेतलेल्या सभा असोत, मोदींनी प्रचाराची सूत्रे स्वतःकडे आणि शहांकडे घेऊन लढतीचे स्वरूप एकतर्फी करून टाकले.

गुजरातेत सुमारे साडेसहा कोटींपैकी जवळपास अडीच कोटी नागरिक केवळ अहमदाबाद, बडोदा, राजकोट, सुरत आणि भावनगर या पाच शहरांमध्ये राहतात. भाजपच्या विरोधात जातील असा अनेक गोष्टी या निवडणुकीत होत्या. खुद्द मोदींनाही, हा गुजरात ‘मी‘ बनविला आहे, असे जाहीर सांगण्याची वेळ आली होती यातच सारे काही आले!

बेरोजगारी, महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे गुजरातेतही मोडले आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भूपेंद्र पटेल यांच्या सरकारने (म्हणजे मोदी -शहाच!) त्यासाठी काहीही केले नाही. बिल्किस बानोचे बलात्कारी निर्दोष सोडले, नरोडा पाटिया दंगलीत दोषी ठरलेले मनोज कुक्राणी यांची मुलगी पायल हिला भाजपने तिकीट दिले, सर्वांत भयंकर अशी ‘मोरबी‘ पूल दुर्टना झाली व १४० च्या वर लोकांनी हाकनाक जीव गमावले, असे मुद्दे असूनही गुजराती जनतेने पुन्हा मोदींनाच जनादेश दिला....अगदी मोरबी वासीयांनीही !

आपचा वाढता प्रभाव

गुजरातेत यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही हात आजमावला व उत्तर भारताच्या पलीकडे ‘सीमोल्लंघन' केले. त्यांना फारशा जागा मिळू शकल्या नाहीत तरी त्यांची मतांची टक्केवारी १२.७ टक्के इतकी वाढली हे दुर्लक्षून चालणार नाही. अनेक जागांवर आप ने कॉंग्रेसला थेट फटका दिल्याचे, कॉंग्रेसच्या व्होटबॅंकेवरच डल्ला मारल्याचे दिसते.

यावेळी कॉंग्रेस व आपची मते एकत्र केली तर त्या ७५ ते ७७ जागाच भरतात. यापुढे राष्ट्रीय राजकारणात यापुढे आप हा कॉंग्रेसला पर्याय म्हणून स्वतःला स्थापित करण्याची वाढती धडपड करणार हे स्पष्ट दिसते. यंदा गुजरातेत भाजपनंतर प्रचारात तरी फक्त 'आप' दिसत होता. मात्र आप हा थेट कॉंग्रेसला पर्याय कसा ठरू शकतो? याला कॉंग्रेसकडून ‘प्रतिवाद' होताना दिसतच नाही.

कॉंग्रेस को क्या हो गया ?

या संपूर्ण निवडणुकीत राहूल गांधी यांच्या ओढऊनताणून केलेल्या २-३ सभा सोडल्या तर काँग्रेस जमिनीवर तसा दिसलाच नाही. काँग्रेसकडे अहमद पटेल यांच्यानंतर गुजरातेत संघटना नाही, यंत्रणा नाही, पैशाची वानवा आणि हार्दिक पटेल सारखे नेतेही भाजपवासी झाल्यावर कॉंग्रेसकडे यंदा मोठा चेहराही नव्हता. त्यात गांधी घराण्याने गुजरातकडे जणू पाठच फिरवली.

थकले भागलेले मल्लिकार्जुन खर्गे गेले आणि रावण वगैरे काहीबाही बोलून मोदींच्या जागा वाढवून आले ! ‘भारत जोडो‘ यात्रेवर निघालेले राहूल गांधी व त्यांच्या यात्रेला कसा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे हे रंगवून रंगवून सांगणारे कॉंग्रेसचे ‘हलगीकार' ही मंडळी कॉंग्रेसच्या निवडणुकीच्या राजकारणातील पीछेहाटीचा गंभीरपणे विचार करणार का, हा मूळ प्रश्न आहे.

कॉंग्रेसच्या निष्ठावान केडरचे काय ?

कॉंग्रेसला १९९१ मध्ये मिळालेल्या ३१ जागांचा नीचांकी ‘विक्रम'ही त्या पक्षाने यंदा मोडला. २०१७ मध्ये ४१ टक्क्यांहून जास्त मतटक्का असलेला कॉंग्रेस २०२२ मध्ये २७ टक्के मते मिळवतानाही धापा टाकतो हे कशाचे लक्षण मानायचे? पुढच्या वर्षात (२०२३) ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका आहेत म्हणजे पुढचे वर्ष हे एका अर्थाने मिनी लोकसभा निवडणुकांचे वर्ष आहे.

हिमाचलसारखे स्वतःच्या ताकदीवर निवडणूक खेचणारे कार्यकर्ते -नेते असतील तेथे कॉंग्रेसला उज्वल भवितव्य आहेच. बाकी ठिकाणी गेहलोत-पायलट सदृश कलगीतुऱयात भाजप कॉंग्रेसच्या तोंडचा घास पळवणार ! कोणी काही म्हणो, कॉंग्रेसची पाळेमुळे, धर्मरिपेक्षता, राज्यघटना यावर अतूट विश्वास असणारे कार्यकर्ते आजही देशाच्या ग्रामीण भागात आहेतच. स्वतः राहूल भले ‘बुध्दत्वा‘च्या मानसिकतेत जावोत...कॉंग्रेसच्या निष्ठावान केडरचे काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com