ओमिक्रॉनचा शिरकाव होताच घाबरलेल्या राज्याने लसीकरण केलं बंधनकारक

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Omicron
OmicronSarkarnama

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) नवीन ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीएंटने देशाची चिंता वाढवली आहे. देशात या विषाणुचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एक रुग्ण महाराष्ट्रात आहे. जगभरात वेगाने वाढणाऱ्या या विषाणुची भीती आता वाढू लागली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लसीकरण वेगाने करण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता देशात लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे.

लसीकरण वाढवण्यासाठी अनेक राज्यांकडून विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. आकर्षक बक्षिसांसह विविध सवलती दिल्या जात आहेत. तर काही ठिकाणी लसीकरण नसल्यास विविध बंधनेही घातली आहेत. पण अद्याप एकाही राज्याने लसीकरण बंधनकारक केलेले नव्हते. आता यामध्ये पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाने आघाडी घेतली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला लसीकरण बंधनकारक करण्याचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत.

Omicron
भाजप नगरसेवक सहलीवर; छोटू भोयरांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

आरोग्य विभागाच्या संचालकाने हे आदेश काढले आहेत. पुदुच्चेरी सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत लसीकरण बंधनकारक करण्यात आले असून त्याची तातडीने अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. लस न घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत सुमारे 127 कोटी डोस देण्यात आले आहेत. सध्या सुमारे 99 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 98.35 टक्के एवढा असून आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 60 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

देशात ओमिक्रॉनचे चार रुग्ण कुठे?

देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आला होता. या राज्यात दोन रुग्ण आहेत. एक रुग्ण दुबईला पळून गेला असून दुसरा रुग्ण डॉक्टर आहे. तर गुजरामध्ये देशातील तिसरा रुग्ण आहे. चौथा रुग्ण महाराष्ट्रात डोंबिवली येथे आढळून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील रुग्णाबाबत...

ओमिक्रॉनची लागण झालेला तरूण डोंबिवलीतील आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेला आहे. या तरुणाला सौम्य ताप आला होता. त्याला इतर कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ताप आल्यामुळे त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले असता त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. त्याला सौम्य स्वरूपाचा ताप असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या जवळच्या लोकांना आणि २३ कमी जोखमीच्या निकट च्या लोकांचा शोध घेण्यात आला. त्यातील सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.

विमानतळावर प्रवाशांची तपासणी...

आज (ता. ४) सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातून आलेल्या सर्व ३ हजार ८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. इतर देशांमधून आलेल्या १७ हजार १०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील सर्वेक्षण सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com