आठवा आमदार न मिळाल्याने गोवा काँग्रेसमधील 'एकनाथ शिंदे' यांचे बंड थंडावले...

Eknath Shinde | Congress | Goa | Digambar kamat : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या आमदारांचे बंड
Digambar Kamat
Digambar Kamatsarkarnama

पणजी : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे शिवसेनेतील (Shivsena) तब्बल दोन तृतीयांश आमदारांनी वेगळी भूमिका घेतली होती, त्याचप्रमाणेच गोवा काँग्रेसमध्ये देखील माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael lobo) यांच्या नेतृत्वात आज घडामोडी घडणार होत्या. मात्र दोन तृतीयांश आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसमधील हे बंड तुर्तास गुंडाळले असल्याचे बोलले जात आहे.

दोन तृतीयांश आमदार फोडून काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचे आपले प्रयत्न कामत आणि लोबो या दोन्ही नेत्यांनी रात्री शेवटपर्यंत चालू ठेवले होते. काँग्रेसच्या या बंडात सुरवातीला दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा हे सहा आमदार होते. अशातच एका खनिज उद्योजकाच्या मध्यस्थीने आमदार आलेक्स सिक्वेरा हेही त्यांच्यात सामील झाले.

आज काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीलाही ११ पैकी ७ आमदारांनी दांडी मारली होती. मात्र युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, रुडोल्फ फेर्नांडिस आणि संकल्प आमोणकर या चारपैकी एकही आमदार फुटण्यास तयार नसल्याने तूर्तास हे बंड थंडावले असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेत्याची तात्काळ हकालपट्टी; माजी मुख्यमंत्र्यांवरही कारवाई

दरम्यान, कामत आणि लोबो या दोघांवरही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून मायकल लोबो यांची गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांवर पक्षांतरी बंदी कायद्याच्या प्रक्रियेतून जी काही कारवाई असेल तीर होणार असल्याची घोषणा गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली आहे. दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

दिनेश गुंडूराव पुढे म्हणाले, आमचे किमान दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदार फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न होते. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेली रक्कम ऐकून मला धक्का बसला आहे. पण आमचे ६ आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. आता नवा नेता निवडला जाईल, अशी माहितीही राव यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com