गँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची प्रकृती ढासळली आहे.
gangster chhota rajan shifted to delhi aiims from tihar jail
gangster chhota rajan shifted to delhi aiims from tihar jail

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तिहार कारागृहाच्या (Tihar Jail) अधिकाऱ्यांनी दिली. त्याच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

छोटा राजनला पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला एम्समध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. याआधी तिहार कारागृहात अतिशय कडेकोट बंदोबस्तात असलेला छोटा राजन हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी एप्रिल महिन्यात त्याला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्सम) तातडीने दाखल करण्यात आले होते. न्यायालयीन सुनावणीवेळी हा प्रकार समोर आला होता. 

राजन (वय 61) याचे इंडोनेशियातून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याला बालीतून 2015 मध्ये भारतात आणले होते. तेव्हापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मुंबईत दाखल असलेले सर्व खटले केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहेत. हे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याता आली आहे. राजन याच्या विरोधात खंडणी आणि खुनाचे तब्बल 70 खटले प्रलंबित आहेत. 

राजन याच्यावरील प्रकरणाची न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी तिहारच्या कारागृह अधिकाऱ्यांनी राजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, त्याला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केल्याचेही सांगितले. 

राजन याला 2018 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या 2011 मधील हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नुकतीच हनिफ कडावाला याच्या हत्या प्रकरणातून राजन याची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मुक्तता केली होती. कडावाला हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com