बाहुबली अन्सारी सुखरुपपणे उत्तर प्रदेशात पोचला अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला चौदा तासांच्या प्रवासानंतर आज बांदा येथील तुरुंगात आणले.
gangster and mla mukhtar ansari brought back in uttar pradesh by police
gangster and mla mukhtar ansari brought back in uttar pradesh by police

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांनी पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता व बहुजन समाज पक्षाचा आमदार मुख्तार अन्सारी याला तब्बल चौदा तासांच्या प्रवासानंतर आज पहाटे बांदा येथील तुरुंगात आणले. पंजाबमध्ये व्हीलचेअरवरून रुग्णवाहिकेत बसणारा अन्सारी उत्तर प्रदेशात पोचल्यानंतर मात्र गाडीतून उतरून थेट तुरुंगात चालत गेला. मुख्तार हा मऊ मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला आहे. 

मुख्तार अन्सारी याला सुरुवातीला बराक क्रमांक पंधरामध्ये ठेवण्यात आले. नंतर त्याला सोळा क्रमांकाच्या बराकीत हलवण्यात आले. याआधीही अन्सारीला या बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. आता अन्सारीची कोरोना चाचणी केली जाणार आहे. अन्सारीच्या बराकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तिथे त्याच्याशिवाय इतर कोणत्याही कैद्याला ठेवले जाणार नाही. 

अन्सारी याला या तुरुंगात खास वागणूक अथवा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही, असे तुरुंग प्रशासन विभागाचे मंत्री जयप्रतापसिंह जॅकी यांनी सांगितले आहे. सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच अन्सारी याला सुविधा देण्यात येतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले 

उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक काल (ता.६) दुपारी दोनच्या सुमारास अन्सारीला घेऊन रोपड येथून निघाले होते. पोलिसांच्या ताफ्यामध्ये दहा वाहनांचा समावेश होता. या मोहिमेत दीडशे कर्मचारी सहभागी होते. हा वाहनांचा हा ताफा पतियाळा रोडमार्गे सायंकाळी हरियानातील करनाल येथे पोचला. यानंतर नोएडा, मथुरा, आग्रा, देहात, हमीरपूरमार्गे पहाटे ४.३४ च्या सुमारास तो बांदा येथे पोचला. 

पोलिसांकडून अमानवी वागणूक 
मुख्तार अन्सारीला पंधरा तासांच्या प्रवासामध्ये अमानवी वागणूक देण्यात आली. त्याला जेवायलाही देण्यात आले नव्हते तसेच पाणी आणि आरोग्य सुविधा देखील नाकारण्यात आल्या. भुकेल्यापोटी त्याला तुरुंगात आणण्यात आल्याने तो बेशुद्ध अवस्थेतच होता, असे मुख्तार अन्सारीचे बंधू व खासदार अफझल अन्सारी यांनी म्हटले आहे. 

अन्सारीच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अन्सारीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये आणि त्याच्यावरील खटले निष्पक्षपणे चालवावेत, अशी मागणी करणारी याचिका अन्सारीच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (ता.९) सुनावणी होणार आहे. मुख्तारच्या जीवाला उत्तर प्रदेशात धोका असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com