गडकरी म्हणतात...आता काहीही बोललो तरी 'ब्रेकिंग' चालते !

Nitin Gadkari : नवीन नंबर प्लेट न बसविणाऱ्या नाठाळ वाहनचालकांना पकडण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक आणू
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari Sarkarnama

नवी दिल्ली : महिन्याच्या १ तारखेला ज्यांना नियमित पगार मिळतो त्यांना वेळेचे महत्व जन्मात लक्षात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. या जगात कोणीही ‘पूर्णांक' नाही, सगळे ‘अपूर्णांक' आहेत, असे सांगतानाच, आजकाल मी काहीही वोललो तरी त्याचा वेगळाच अर्थ लावून ब्रेकिंग चालविली जाते, असे त्यांनी सांगताच हशा उसळला.

निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘नोकर-शाईचे रंग' या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांनी केले. इंदिरा गांधी कला केंद्राचे प्रमुख सच्चिदानंद जोशी, प्रकाशक राजगोपाल वर्मा, साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के एस राव आदी उपस्थित होते. गडकरी यांना भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळातून वगळल्यापासून त्यांच्या प्रत्येक वाक्यात ‘अर्थामागील अर्थ' शोधण्याची अटोकाट धडपड पत्रकार करतात त्यावर त्यांनी मिश्किल भाष्य केले. (Union Minister Nitin Gadkari Latest News)

Union Minister Nitin Gadkari
एसी लोकलमुळे विधिमंडळातील वातावरण गरम ; ..नाहीतर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल ; आव्हाडांचा इशारा

सनदी अधिकारी असूनही मुळे कविमनाचे आहेत हा विरोधाभासच आहे. असे सांगून गडकरी म्हणाले की, नोकरशाही ही इमेज विरूध्द रिॲलिटी याचे उत्तम उदाहरण असते. निर्णय न घेणे हाच निर्णय ही वृत्ती सोडून लोकाभिमुखता व संवदनशीलतेचे वाहक (कंडक्टर) प्रशासनाने बनाव. फायलींतील अक्षरांमागील अर्थ कोणता, (लेटर व्हर्सेस स्पिरीट) याचे मर्म समजून घेऊन नोकरशाहीने काम केले पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे पण लोकहितासाठी जरूर कायदेभंग करावा असे मी अधिकाऱयांना सांगतो असे नमूद करताना गडकरींनी, ‘‘मेळाघाटातील शेकडो बालमृत्यूंच्या घटनेनंतर आपण तेथील ४५० हून जास्त रस्त्यांचे कसे नियम व फायलींचा पसारा धुडकावून मार्गी लावले होते", याची कथा सांगितली.

Union Minister Nitin Gadkari
पाटकरांचे १० कोटी पुण्यातील एका चहावाल्याच्या बँक खात्यात जमा ; सोमय्यांचा गौप्यस्फोट

या भागात रस्ते नसणे हे मानवाधिकारांचे उल्लंघन होते पण नियमांच्या कचाट्यात तेथे रस्तेच होऊ शकत नाहीत, अशी भीषण परिस्थिती बनवली गेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आपण स्पष्ट सांगितले होते की, ‘सर ये तुम्हारे बस की बात नही, ये काम मुझपे सौंप दो !‘‘तुमच्या टेबलावर फायलींचे चारपेक्षा जास्त थर साचता कामा नयेत" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना बजावल्याचे सांगून गडकरी म्हणाले की रस्ते व महामार्ग मंत्रालय माझ्याकडे आले तेव्हा ३ लाख ८५ हजार कोटींचे किमान ४०६ महामार्गांचे प्रकल्प पडून होते. बॅंकांकडे ३ लाख कोटींच्या थकबाकीचा डोंगर होता. मी रात्ररात्र अधिकाऱयांबरोबर बसून परिस्थिती मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, असेही गडकरी म्हणाले.

ना टोल, ना फास्ट टॅग...सरळ बॅंकेतून पैसे कट !

कल्पना करा की तुमची गाडी महामार्गावरून धावत आहे. तुमच्या गाडीवर फास्ट टॅग नाही व रस्त्यात एकही टोल प्लाझावर तुम्हाला अडवले नाही. पण म्हणून तुम्ही टोल चुकला, म्हणून खूष होण्याचे कारण नाही. कारण टोल नाक्यावरील कॅमेऱयाने तुमच्या वाहनाची नंबर प्लेट क्लिक केली रे केली की त्याच क्षणी तुमच्या नोंदणीकृत बॅंक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल...या प्रकारची एक अत्याधुनिक योजना आणण्यासाठी आपले मंत्रालय जलदगतीने काम करत आहे, असेही गडकरींनी एका अन्य कार्यक्रमात सांगितले.

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाके लवकरच इतिहासजमा होतील व तेथे केंद्रीय संगणकीकृत प्रणालीवर चालणारे स्वयंचलित कॅमेरे बसविले जातील. २०१९ पासून या प्रकल्पावर काम सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेची चाचणी यापूर्वीच सुरू झाली आहे असे सांगून गडकरी म्हणाले की, यासाठी विशिष्ट नंबर प्लेट देशातील सर्व वाहनांवर बसविल्या जातील. त्यासाठी वाहनचालकांना कालमर्यादा दिली जाईल. सध्याच्या व्यवस्थेत टोल चुकवणारांना कायदेशीर शिक्षेची तरतूद नाही. ती करण्यासाठी व नवीन नंबर प्लेट न बसविणाऱया नाठाळ वाहनचालकांना पकडण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक आणू असेही गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com