रूपानींचा वारसदार कोण? चंद्रकांत पाटलांसह नितीन पटेल, मांडवीय, फाल्डू शर्यतीत

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, राज्यात मुख्यमंत्रिपदी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.
रूपानींचा वारसदार कोण? चंद्रकांत पाटलांसह नितीन पटेल, मांडवीय, फाल्डू शर्यतीत
four names in the race for next gujarat chief minister

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपकडून (BJP) मुख्यमंत्रिपदासाठी चार नावांवर खल सुरू आहे. यातील एका नावावर उद्या (ता.12) शिक्कामोर्तब होईल. 

रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, पर्यायाने मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने उद्या (ता.12) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भाजप संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष, गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर येथे उद्या होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. या नावाचीही उद्याच घोषणा केली जाईल. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन आज राजीनामा सोपवला. गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. आता रुपानी यांची जागी कोण घेणार अशी चर्चा सुरू असून, यात चार नावे आघाडीवर आहेत. 

1) नितीन पटेल 
नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री आहेत. ते पहिल्यांदा विधानसभेवर 1990 मध्ये निवडून गेले. सध्याच्या सरकारमधील ते सर्वांत जुनेजाणते नेते आहेत. ते पहिल्यांदा 1995 मध्ये मंत्री झाले. आरोग्य, कुटुंब कल्याण, कृषी, जलसंपदा, रस्ते, अर्थ व महसूल यासारख्या महत्वाच्या खात्यांची धुरा त्यांनी सांभाळली आहे.  

2) मनसुख मांडवीय 
मांडवीय गुजरातमधील भावनगरचे आहेत. ते राज्यातून राज्यसभेवर गेले आहेत. मांडवीय हे काही वेळापूर्वी रूपानी यांच्या निवासस्थानीही दाखल झाले आहेत. मांडवीय यांना नुकतीच केंद्रात राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्यावर अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

3) आर.सी.फाल्डू 
आर.सी.फाल्डू हे जामनगर दक्षिणचे आमदार आहेत. त्यांनी कृषी, मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि परिवहन या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. 

4) चंद्रकांत पाटील 
चंद्रकांत पाटील हे सुरतचे खासदार आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुरत शहराच्या विकासात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. शहरातील वस्त्रोद्योग आणि हिरे उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. 

रूपानी यांच्या जागी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. पक्ष नवीन मुख्यमंत्री निवडेपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन जावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.