धक्कादायक : आरोग्य मंत्र्यांच्या स्वागतात रुग्णालय गुंतल्याने माजी जवानाचा उपचाराविना मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे आता उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.
former soldier dies of covid as hospital staff busy in preparation for minister visit
former soldier dies of covid as hospital staff busy in preparation for minister visit

पाटणा : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातच आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतात रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी गुंतल्यामुळे कोरोना झालेल्या एका माजी जवानाला प्राण गमावावे लागले आहेत. आरोग्यमंत्री येणार असल्याने या जवानाला रुग्णालयात दाखलच करुन घेण्यास नकार देण्यात आला होता, अशी धक्कादायक बाबही समोर आली आहे. 

ही घटना बिहारमधील पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये (एनएमसीएच) घडली आहे. रुग्णालयाला आरोग्यमंत्री मंगल पांडे हे भेट देणार होते. त्यांच्या स्वागतासाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्यावेळी कोरोनाबाधित विनोदसिंह या माजी जवानाला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.  विनोदसिंह लखीसराई येथील असून, त्यांना 120 किलोमीटर अंतरावरील पाटण्यातील एनएमसीएचमध्ये नेण्यास सांगण्यात आले होते.  

'एनएमसीएच'ने सुरवातीला विनोदसिंह यांना दाखल करुन घेण्याची तयारी दर्शविली. परंतु, त्याचवेळी मंत्र्यांची भेट असल्याने नातेवाईक विनोद यांना घेऊन तास ते दीड तास वाट पाहत बाहेर थांबले होते. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दाखल करुन घेण्याची विनंती करुनही रुग्णालयाने नकार दिला. अखेर उपचाराविना रुग्णालयाच्या दारातच विनोदसिंह यांनी प्राण सोडले. 

देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू 
देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com