तुरुंगात पिण्यासाठी पाणी अन् कमोड नसल्याने पप्पू यादव बसले उपोषणाला

बिहारमध्ये भाजप खासदार राजीव प्रताप रुडीयांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब पप्पू यादव यांनी समोर आणली होती.
former mp pappu yadav starts agitation in jail in bihar against government
former mp pappu yadav starts agitation in jail in bihar against government

नवी दिल्ली : जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांना अटक करण्यासाठी 32 वर्षांपूर्वीचे अपहरण प्रकरण उकरुन काढण्यात आले आहे. पप्पू यादव यांना सुपौलमधील वीरपूर तुरुंगात (Jail) ठेवण्यात आले आहे. आता तुरुंगात पिण्यासाठी पाणी, वॉशरुम आणि कमोड नसल्याने यादव यांनी उपोषण सुरू केले  आहे. (former mp pappu yadav starts agitation in jail in bihar against government)

पप्पू यादव यांच्या अटकेवरुन बिहारमधील राजकारण तापले आहे. यातच पप्पू यादव यांनी कारागृहातच उपोषण सुरू केले आहे. पप्पू यादव यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. तुरुंगातील अव्यवस्थेबाबत त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, वीरपूर तुरुंगात मी उपोषणाला बसलो आहे. येथे पिण्यासाठी पाणी नाही तसेच, वॉशरुमही नाही. माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून, मला शौचालयात खाली बसता येत नाही तर येथे कमोडही नाही. मला रात्रभर डास चावले. 

कोरोना रुग्णांची सेवा करणे, त्यांचा जीव वाचवणे हाच माझा गुन्हा आहे. औषधे माफिया, हॉस्पिटल माफिया, ऑक्सिजन माफिया, अॅम्बुलन्स माफिया यांचा पर्दाफाश करणे हाच माझा अपराध आहे. माझी ही लढाई सुरूच राहील, असा इशाराही पप्पू यादव यांनी दिला आहे. 

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या रुग्णवाहिका पडून आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे पप्पू यादव यांनी समोर आणले होते. 

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्या अटकेवरुन राजकारण तापले आहे. त्यांना पोलिसांनी 32 वर्षांपूर्वीच्या अपहरण प्रकरणात अटक केली आहे. यादव आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांनी दोन युवकांचे 29 जानेवारी 1989 रोजी अपहरण केले होते. काही दिवसांनंतर हे दोन्ही युवक सुखरुपपणे परत आले होते. या प्रकरणी त्यांना जामीनही मंजूर झाला होता. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. 

यादव यांच्या अटकेवरुन जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी यादव यांच्यासाठी रात्रीच न्यायालयाकडे विनंती करुन ते सुरू केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यादव यांना सुपौल कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथूनच ही सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com