विधानसभेत येडियुरप्पांची जागा पहिल्या बाकावरून थेट शेवटच्या बाकावर

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत हजेरी लावली.
विधानसभेत येडियुरप्पांची जागा पहिल्या बाकावरून थेट शेवटच्या बाकावर
former karnataka chief minister b s yediyurappa sat on last bench

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता पुन्हा विधानसभेत दिसू लागले आहेत. परंतु, विधानसभेत ते शेवटच्या बाकावर बसल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या बाकावर बसणारे येडियुरप्पा मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर शेवटच्या बाकावर आले आहेत. 

मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर येडियुरप्पांनी पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली. विधानसभेत येडियुरप्पा हे शेवटच्या बाकावर बसल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अखेरीस खुद्द येडियुरप्पांनीच स्वत: शेवटच्या बाकावरील जागा मागून घेतल्याचे समोर आले. येडियुरप्पा यांच्या शेजारी शेवटच्या बाकावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बसलेले आहेत. 

याबाबत बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, मुख्य प्रतोदांच्या शेजारी मला जागा मिळावी, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्षांना केली होती. माझी ही विनंती अध्यक्षांनी मान्य केली. मी आता याच जागेवर बसून विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होईन. आता मी भाजपच्या सामान्य आमदाराप्रमाणे काम करणार आहे. मागील बाकावर बसून सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक मी करेन. मी बोम्मई सरकारला सर्वतोपरी मदत करीत राहीन. 

येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर होता. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in